महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये झालेल्या आनंद कांबळेच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. प्रेम प्रकरणामधून आनंद कांबळेचा खून झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी वाई आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं निखील मळेकरला पिंपरी चिंचवडमधून अटक केली आहे. दिक्षाचे आणि नितीनचं प्रेम होतं पण घरच्यांच्या विरोधामुळे या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. अखेर कुटुंबाच्या जबरदस्तीमुळे दिक्षानं आनंदशी लग्न केलं. २० मे रोजी दोघांचं लग्न झालं. लग्नानंतर दिक्षा आणि आनंद हनीमूनला महाबळेश्वरला निघाले.
पुण्यातील बाणेरमध्ये आनंद कांबळे आणि दिक्षा ओव्हाळ यांचं घरच्यांच्या संमतीनं मोठ्या धुमधडाक्यात २० मे रोजी लग्न झालं. या सोहळ्यानंतर नवविवाहित जोडपं दुसर्या एका जोडप्यासह पाचगणी-महाबळेश्वरला हनीमूनला जायला निघाले. घाटाचा रस्ता असल्यामुळे दिक्षाला उलटी व्हायला लागली. त्यामुळे आनंदनं वाहनचालकाला गाडी थांबवायला सांगितली. दिक्षाला त्रास होत असल्यामुळे आनंद तिच्या शेजारी उभा होता. त्यावेळी अचानक दुचाकीवरुन दोघं आले आणि त्यांनी आनंदवर हल्ला केला आणि दिक्षाला धक्काबुक्की केली. हल्लेखोरांनी दिक्षाच्या अंगावरचे दागिने लुटले तर आनंदवर चाकूनं हल्ला केला. आनंदला उपचारासाठी दवाखान्यात नेलं असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर सातारा आणि पुणे पोलिसांनी या मार्गावरील लुटारु टोळीचा सुगावा घेतला, पण त्यामध्ये तथ्य आढळले नाही. यानंतर पोलिसांनी पुढचा तपास केला असता निखील मळेकर आणि दिक्षा याचं लग्नाआधी प्रेमसंबंध होते हे समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी निखील मळेकरला चिंचवडमधून ताब्यात घेतलं. चौकशी केली असता त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केलं आहे.
नवविवाहित दिक्षा आणि निखिल मळेकर यांनी दोन व्यक्तींना सुपारी देऊन आनंद कांबळेचा काटा काढण्याचा डाव रचला होता. आनंद कांबळे वर ज्या वेळी वार करण्यात आले त्यावेळी तो पळून जात असताना देखील त्याचा पाठलाग करून त्याला मारण्यात आले पण दीक्षाला मारेकऱ्यांनी काहीच केले नाही या वरूनच पोलिसांनी रात्री तपासाची यंत्रणा फिरवली आणि या दोघांना अटक केली.