अलिबाग : निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीवरुन रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये उभा वाद निर्माण झाला आहे. सरकार आणि सामाजिक संस्थांकडून आलेली मदत फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच वाटली जाते, असा आरोप थेट शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नवगडे यांनी हा आरोप केला आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार सरकारी अधिकारीही मदत वाटताना पक्षपाती पणा करत आहेत, असा आरोपही शिवसेनेने केला आहे.
'इथले तहसीलदार आणि प्रांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांमार्फत साहित्य वाटण्याचा घाट घालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकं फक्त श्रीमंत लोकांनाच धान्य देत आहेत. त्यांच्या लोकांनाच मदत दिली जात आहे आणि ही मदतही त्यांच्याच घरी ठेवली जात आहे. तहसीलदार आणि प्रांत यांना खासदार आणि पालकमंत्री हे करायला लावत आहेत. पालकमंत्र्यांना फक्त आपला पक्ष दिसत आहे. हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत का पक्षाचे आहेत,' अशी टीका शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी केली आहे.
दुसरीकडे आदिती तटकरे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. आदिती तटकरे यांनी शिवसेनेचे हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मदत देताना कोणताही पक्षपातीपणा होत नाही, असा दावा आदिती तटकरे यांनी केला आहे.