Maharastra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या याच फोटोवरून वादाची ठिणगी पेटली. हा फोटो आहे उमरेडमधला. कर्ली टेल्स या युट्युब चॅनलच्या एडिटर, फूड आणि ट्रॅव्हल ब्लॉगर कामिया जानी यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे जेवणाचा आस्वाद घेतायत. मात्र हा फोटो भलत्याच कारणासाठी व्हायरल झाला. ऐन रामनवमीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सावजी मटण खाल्लं, असा आरोप अनेकांनी सोशल मीडियावर या फोटोच्या हवाल्यानं केला. प्रत्यक्षात हा दावा खोटा असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांसोबत आपण व्हेज म्हणजे शाकाहारी सावजी जेवणाचा आस्वाद घेतला, असा व्हिडिओ स्वतः कामिया जानींनी एक्सवरून ट्विट केलाय. मुख्यमंत्र्यांनी मटण नाही, तर पातोड्या, वांग्याचं भरीत आणि वांग्याची भाजी असं शुद्ध शाकाहारी जेवण केलं होतं.
असाच एक वाद राष्ट्रीय पातळीवर देखील रंगला. राष्ट्रीय जनता दलाचे युवा नेते तेजस्वी यादव यांनी विमानामध्ये मच्छी खात असल्याचा व्हिडिओ शेअर केला. चैत्र नवरात्री सुरू असताना मासे खातानाचा असा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण काय? तेजस्वी यादव हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची जोरदार टीका सोशल मीडियावरून झाली. मात्र हा व्हिडिओ चैत्र नवरात्र सुरू होण्याआधीचा असल्याचा खुलासा तेजस्वी यादवांनी केला. यावरून खुद्द पंतप्रधान मोदींनीही त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.
दरम्यान, कुणी काय खावं आणि काय खाऊ नये, यावर कुणालाही निर्बंध घालण्याचं कारण नाही. मात्र मोसम निवडणुकांचा आहे. त्यामुळं कोण, कशाचा आणि कसा वापर करेल, याचा नेम नाही... म्हणूनच तर महागाई, बेरोजगारी, वाढती गरीबी असे अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना चर्चा मात्र मांस, मच्छी आणि मटण-मांसाहाराची होतेय.