पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुलींबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलेय. यावरुन राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झालेय. बापट यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केलेय. बापट यांना याची किंमत मोजावी लागेल, असा थेट इशारा दिलाय.
भाजपचे मंत्री गिरीश बापट यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यानंतर त्यांना सारावसारव करावी लागली आहे. याआधी बापट यांनी 'महाविद्यालयीय विद्यार्थ्यांसमोर म्हटले होते, तुमच्या मोबाईलमध्ये काय काय असते ते माहित आहे. तुम्ही आम्हाला म्हातारे समजू नका, पिकल्या पानाचा देट हिरवा ' असे म्हटले होते. त्यामुळे महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
आता पुन्हा एकदा बापट यांची जीभ घसरली आहे. त्यांनी मुलींबाबत वादग्रस्त विधान केलेय. ‘चल म्हटली की लगेच चालली’, असे म्हटले. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली. बापट आणि भाजपच्या नेत्यांना भविष्यात या सगळ्याची नक्कीच किंमत मोजावी लागेल, असे विधान पवार यांनी केले.
पुण्यातील एका कार्यक्रमात बापट यांचा तोल गेला. विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत वादग्रस्त व्यक्तव्य केले. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक रुप धारण करीत पोस्टरबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी पुण्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात बॅनर लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. ‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा आहे, त्वरित संपर्क साधा, गिरीश बापट यांचे निवासस्थान’ असा मजकूर त्यावर होता.
आपण राज्य सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री आहोत, याची जाणीव बापट यांना असायला पाहिजे. त्यांनी अशा प्रकारची विधाने करता कामा नये, असा सल्ला यावेळी अजित पवार यांनी दिलाय.