अमर काणे, झी २४ तास, नागपूर : मान्सूननं काल त प्रवेश केल्यानंतर आज संपूर्ण विदर्भाला व्यापलं आहे. त्यानंतर आता 12 आणि 14 दरम्यान नागपूरसह पूर्व विदर्भात हवामान विभागान ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा वेगानं होतं आहे.
विदर्भात एक आठवडा अगोदरच मान्सूननं धडक दिली. विदर्भात दमदार एन्ट्री मारल्यानंतर पुढील 4 दिवस विदर्भात पावसाची चांगली बॅटिंग दिसण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतं आहे. त्यामुळं 11 ते 14 जून दरम्यान विदर्भात अनेक ठिकाणी पावासाचा जोर दिसेल.
तर पूर्व विदर्भात नागपूरसह, भंडारा, गोंदीया, गडचिरोली मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्टही हवामान विभागानं आज दिला. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
हा कमी दाबाचा पट्टा ओडिशावरून पुढे सरकेल. त्यादरम्यान त्याचा प्रभाव विदर्भात दिसेल. काही ठिकाणी अतीवृष्टीची शक्यताही हवामान विभागान वर्तवली आहे. त्यामुळं या विकेंडला पूर्व विदर्भ वासीयांनी घरी थांबणंचं योग्य ठरेल. दरम्यान मान्सूनच्या आगमनामुळं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत
हवामान विभागानं 11 ते 14 दरम्यानच्या दिलेल्या ऑरेंज अलर्टनंतर नागपूर प्रशासनानंही त्या अनुषंगाने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी व नदी नाल्या जवळ राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहे.
दुपारी २ ते ६ या वेळेत विज पडण्याचा धोका असल्या कारणाने पाऊस आणि वादळीवारा सुरू असताना झाडा खाली उभे राहू नये. अशा वातावरणात शेतकऱ्यांनी अतिशय काळजी पूर्वक शेताची कामे करावी आणि शक्य असल्यास घरीच थांबावे.
घरातील दारे खिडक्या तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावी. नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास तो ओलांडण्याचा प्रयत्न न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.