पालघर : शिवसेनेला आता दिल्लीच्या मातोश्रीचे आदेश मानावे लागतात, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादीशी संघर्ष केला, त्या बाळासाहेबांना आज स्वर्गात काय वाटत असेल, याची कल्पनाही करवत नाही. सत्तेसाठी तुम्ही कोणत्या स्तराला जाता ते आम्ही बघितलं. तुम्ही काहीही करुन सत्ता स्थापन केली, पण तुम्ही जनतेशी बेईमानी करत आहात. वर्गात पहिला आलेल्या मुलाला बाहेर बसवण्यात आलं,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
'सोनिया गांधींचा आदेश आल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत मतदानावर बहिष्कार घातला. आता शिवसेनेचे आदेश मातोश्रीवरुन निघत नाहीत. दिल्लीच्या मातोश्रीचे आदेश शिवसेनेला मानावे लागतात,' असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.
शेतकरी कर्जमाफीवरुनही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. '२५ हजार रुपये देतो म्हणून सांगितलं आणि हाती भोपळा दिला. शेतकऱ्यांची बेईमानी करण्यापासूनच या सरकारची सुरुवात झाली आहे. आम्हाला मदत द्यायची आहे, पण आम्ही मोदींकडे मदत मागतो आहे. पण सरकार बनवताना मोदी साहेबांची आठवण नाही आली. शब्द देताना मोदी साहेबांची आठवण नाही आली. मोदींच्या जीवावर शब्द दिला होता का? जी मदत करायची आहे ती मोदी करतीलच, पण तुमच्या मनगटात जोर पाहिजे. सरकार बनवता, तीन पक्ष एकत्र येता आणि सांगता आम्ही मदत करु, पण एका नव्या पैशाची मदत केली नाही,' अशी टीका फडणवीस यांनी केली.
सरकार स्थापनेनंतर पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची लागलेली ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. पालघर जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज पालघरमधील डहाणूतील कासा येथे आले असताना बोलत होते.