मुंबई : राज्यात बीडचे राजकारण हा चर्चेचा विषय असतो. कारण याठिकाणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ असले तरी ते कट्टर राजकीय विरोधक आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान, हा विरोध दिसून आला. आरोप-प्रत्यारोपानंतर येथील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले होते. बहिण-भावाचे नाते असले तरी राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी अशी दोघांची ओळख गेल्या निवडणुकीत दिसून आली. बीड-परळीत मुंडे घराण्याचे वर्चस्व दिसून येत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांचा वारस म्हणून पंकजा मुंडे पुढे आल्यात. त्यांची बहिण खासदार आहे. मुंडे घराणे भाजपशी आधीपासून जोडले गेले आहे. मात्र, धनंजय मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे राजकीय विरोधक झालेत. परळी विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर मुंडे बंधू-भगिनी पुन्हा एकदा आमने-सामने आले. संत वामनभाऊ यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त गहिनीनाथ गड याठिकाणी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी दोघांनीही भाषणातून एकमेकांना कोपरखळ्या मारल्या.
दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असत. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत एकदम टोकाला हे आरोप गेलेत. पंकजा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे हे पराभूत झाले होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असूनही पंकजा यांनी धनंजय यांना दे धक्का दिला होता. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केले. तसेच जिल्हा परिषदेत त्यांनी आपले वर्चस्वही मिळवले. त्यामुळे दोघे राजकीय विरोधक कधी पुन्हा एकाच व्यासपीठावर येतील, अशी शक्यता होती. मात्र, दोघे बहिण-भाऊ एकाच व्यासपिठावर दिसलेत. निमित्त होते, पाटोदा तालुक्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथील संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात गडांना मोठे महत्व आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर शुक्रवारी संत वामनभाऊ यांचा पुण्यतिथी सोहळा होता. या सोहळ्यानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे दोघेही उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघे प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसलेत. मात्र, मागिल सत्तेच्या काळातही दोघांनी एकत्र येण्याचे टाळले होते. अगदी पंकजा मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकासकामांच्या आढावा आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना धनंजय मुंडे हे उपस्थित राहिलेले नाहीत. राजकीय शिष्टाचानुसार शासकीय कार्यक्रमांच्या पत्रिकांवर दोघांची नावे छापलेली असली तरी ते कधी एकत्र दिसलेले नाहीत. त्यामुळे आजच्या उपस्थितीनंतर चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, येथील गडावर धनंजय मुंडे जातात. मात्र, ते कोणाची भेट होऊ नये म्हणून ते पहाटेच पूजा करुन परतत असत. पंकजा मुंडे मंत्री असल्याने त्या मुख्यकार्यक्रमाला उपस्थित राहत असत. त्यावेळी धनंजय मुंडे उपस्थित नसायचे. यावेळी ते गुरुवारी रात्रीच गडावर मुक्कामी गेले होते. त्यांच्या प्रमुख हस्ते मुख्य पूजा झाली. त्यानंतर मुख्यकार्यक्रमाच्यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहिल्या. त्यामुळे अनेक वर्षानंतर दोघे एकाच व्यासपीठावर दिसलेत.