पुणे : वर्षा गायकवाड या पुणे दौऱ्यावर असतांना पुण्यातील पालकांनी वर्षा गायकवाड यांना घेराव घालत मोठा गोंधळ घातला होता. वर्षा गायकवाड या फी आणि परीक्षा संदर्भात ठोस भूमिका घेत नसल्यानं पालक चांगलेच आक्रमक झाले. बालभारती भवनासमोर पालकांनी शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 30 जानेवारीपर्यंत फी वाढीसंदर्भात राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला नाही आणि प्रवेश सुरू झाले नाहीत तर वर्षा गायकवाड यांच्या मुंबईतील घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला.
राज्यातील शाळा टप्प्याटप्यानं सुरु होत आहेत. लवकरच पहिली ते चौथी पर्यंत शाळा सुरु होतील असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. ७६% विद्यार्थी शाळेत येतायत आणि एसओपीप्रमाणे सर्व शाळा सुरु असल्याचं त्या म्हणाल्या. तर मुंबईतल्या शाळांच्या संदर्भात स्थानिक प्रशासन निर्णय घेणार आहे, वेळ आली तर मुंबईच्या आयुक्तांशी बोलू असही त्या म्हणाल्या.
दरम्यान आता 5 वी ते 8 पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. पहिला दिवस असल्यामुळे उपस्थिती कमी असली, तरी लवकरच बहुतांश विद्यार्थी शाळेत परततील, अशी शिक्षकांना आशा आहे. त्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायझर्सचा वापर करण्यात येतो आहे. पालकाच्या संमतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे.