बारामती : पार्थ पवार यांच्या संदर्भातील विषय दोन दिवसात निवळेल, असा विश्वास कुटुंबातील निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. पार्थ पवार आज बारामती जवळच्या कन्हेरी मध्ये आले आहेत. काका श्रीनिवास पवार आणि काकी शर्मिला पवार यांची ते भेट घेत आहेत. पार्थ पाठोपाठ त्याच्या आई सुनेत्रा पवार देखील बंगल्यावर पोहोचल्या. अजित पवार देखील इथं येणार असल्याची चर्चा होती, मात्र ते आलेले नाहीत.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो वा राम मंदिराचा विषय त्याबाबत पार्थने घेतलेली भूमिका चूक की बरोबर? हे ठरवता येणार नाही. त्याचप्रमाणे शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताविषयी प्रश्न उपस्थित करता येणार नाही. दोघेही त्यांच्या त्यांच्या जागी बरोबर असू शकतात. भूमिकांबाबत चूक, बरोबर ठरवता येवू शकत नाही. साहेबांचं कुटूंबातील ज्येष्ठत्व आणि वय याचाही विचार करायला हवा. या सगळ्यात पार्थ दुखावला जाणे स्वाभाविक आहे, मात्र अशा गोष्टी कुटुंबात घडत असतात. विचार विनिमयातून सर्व काही ठीक होईल. पार्थची नाराजी दूर होईल, असा विश्वास पवार कुटुंबातील सदस्याने व्यक्त केला आहे. मात्र त्यांनी या विषयावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय.
दरम्यान पार्थ पवार हेदेखील मीडियाशी बोलण्यास तयार नाहीत. आजची भेट कौटुंबिक असून त्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय. पवार कुटुंबात अशा प्रकारचं वादळ आल्यास श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांची भूमिका महत्वाची ठरलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतील घरी जाऊन बसले होते.
श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांचं कन्हेरी मध्ये शेतात घर आहे. पार्थ यांचं याठिकाणी वरचेवर येणं होत असतं. यावेळी येणार असल्याचं कालच ठरलं होतं, त्यामुळे यावेळच्या भेटीचा संदर्भ किंवा पार्श्वभूमी नेहमीपेक्षा वेगळी आहे, म्हणून या स्नेहभोजन युक्त भेटीकडे साऱ्यांच लक्ष लागलं होतं.