शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले- टोपे

पार्थ पवार प्रकरणाला वेगळं वळण देण्याची गरज नाही, 

Updated: Aug 15, 2020, 04:05 PM IST
शरद पवार पक्षातील ज्येष्ठ नेते, ते पार्थ पवारांना अधिकाराने बोलले- टोपे title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना: पवारांचं घराणं हे राज्यातील आदर्श घराणं आहे. पार्थ पवार प्रकरणाला मीडियाने वेगळं वळण देण्याची गरज नाही.शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून ते पार्थ पवार यांना जे काही बोलले ते अधिकाराने बोलले आहेत. त्यामुळे पार्थ पवार प्रकरणाला वेगळं वळण देण्याची गरज नाही, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारमध्ये सर्व काही ठीक चाललं असून हे सरकार पाच वर्ष चालेल, असा दावाही केला.

पार्थ पवारांच्या नाराजीबाबत पवार कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया

कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करा अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केलीय याबाबत प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या गैरव्यवहाराचे पुरावे द्यावे त्यानुसार कारवाई केली जाईल असेही टोपे म्हणाले. खासगी डॉक्टरांनी सेवेसाठी पुढे यावे अन्यथा मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई केल्या जाईल याशिवाय बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.त्यामुळे जनहितासाठी हे करावंच लागेल असा ईशारा देखील टोपे यांनी खासगी डॉक्टरांना दिला आहे.

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाची सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्य सरकारची चांगलीच गोची झाली होती. यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारले होते. पार्थ पवार अपरिपक्व आहेत. त्यांच्या मताला मी काडीचीही किंमत देत नाही, असे पवार यांनी म्हटले होते. या वक्तव्यामुळे अजित पवार आणि पार्थ पवार प्रचंड दुखावले गेल्याचे समजते. त्यामुळे पवार कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत असले तरी अजित पवार आणि पार्थ पवार यांनी अद्याप जाहीरपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष पार्थ पवार यांच्या भूमिकेकडे लागले आहे.