PM Modi Pune Visit : तयारी अखेरच्या टप्प्यात पोहोचली, निर्धारित कार्यक्रम स्थळं सज्ज झाली आणि हे सर्व चित्र पुण्यात पाहायला मिळत असतानाच अचानकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याचं वृत्त समोर आलं. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनंच यासंदर्भातील अधिकृत माहिती जारी करण्यात आली.
शनिवारपासूनच मुंबई, ठाणे पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. याचाच परिणाम पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील मेट्रो ट्रेनच्या उद्धाटन सोहळ्यासाठी आणि सोबतच 22600 कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या उद्धाटनांसाठी आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत येणं अपेक्षित होतं. पण, पावसाची एकंदर स्थिती आणि हवामानाचा अंदाज पाहता त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला.
पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळं आणि पुढील 24 तासांसाठीच्या हवामानाचा अंदाज पाहता सध्या सर्वत्र पालिका प्रशासनांनी महत्त्वाचे निर्णय घेत शाळा कॉलेजं आणि तत्सम आस्थापनं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तिथं पिंपरी चिंचवडमध्येही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. येथे पर्जन्यमानाचा एकंदर अंदाज पाहता पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याचं म्हटलं गेलं.
पीएम राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग मिशन (एनएसएम) अंतर्गत मोदी स्वदेशी पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या जवळपास 130 कोटींच्या खर्चानं तयार करण्यात आलेले परम रुद्र सुपरकंप्यूटर देशाला समर्पित करणार होते. पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथील अग्रगणी संशोधन संस्थांसाठी हे अत्याधुनिक संगणक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 850 कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱ्या एचपीसी प्रणालीचंही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं. याशिवाय इतरही अनेक विकासकामं आणि योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणं अपेक्षित होतं. दरम्यान, सध्या मोदी प्रत्यक्षात पुण्यात येणार नसले नसले तरीही त्यांच्या या दौऱ्यातील निर्धारित कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारी पार पडणार असल्याची शक्यता आहे.