Maharashtra Politics : राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना बहाल करण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला. शरद पवार गटानं या निकालावर तीव्र आक्षेप घेतले आहेत. शरद पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. 84 वर्षांच्या माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर बुधवारी दिल्लीत शरद पवारांच्या घरी नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटानं चार मोठे आक्षेप घेतले आहेत. पहिला आक्षेप आहे 2019 पासून मतभेद, मग पदं कशी मिळाली? दुसरा आक्षेप आहे की, 30 जूनच्या बैठकीबाबतची लपवाछपवी कशासाठी? तिसरा आक्षेप आहे की, विधिमंडळ पक्षाचा निकष चुकीचा आहे. आणि चौथा आक्षेपवजा आरोप म्हणजे निवडणूक आयोगाचा खोटारडेपणा.
निवडणूक आयोगाच्या या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटानं आधीच घेतलाय.. आता सुप्रीम कोर्ट याबाबत कधी आणि काय निकाल देणार, याची उत्सूकता उभ्या महाराष्ट्राला आहे.
शरद पवार गटाला नवं नाव मिळालंय. 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' असं नवं नाव पवार गटाला मिळालंय. राज्यसभा निवडणुकीसाठी हे नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे नवीन पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही नावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवारांचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये पहिलं नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' असं देण्यात आलं होतं. तर वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
पुण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसवरील घड्याळ हे पक्ष चिन्ह काढून टाकण्यात आले. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घड्य़ाळ चिन्ह काढून टाकलं. निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला घड्याळ हे निवडणूक चिन्ह बहाल केलंय.