Pooja Khedkar Case : आताची मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांना अटक होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टाने (Delhi Patiyala House Court) पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे फ्रॉड केल्याबद्दल केंद्रीय लोकसेवा आयोगानं पूजा खेडकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी पूजा खेडकरनं दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण पूजा खेडकर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
पूजा खेडकर यांच्या वकिलांचा युक्तीवाद
बुधवारी कोर्टात याबाबतची सुनावणी झाली तेव्हा त्यांच्या वकिलांनी असे काही युक्तिवाद केले की, या केसला वेगळंच वळण लागलंय. पूजा खेडकर फ्रॉड नाही, तर फायटर आहे, असा दावा तिचे वकील अॅड. माधवन यांनी केला. पूजा खेडकर ही एकापेक्षा अधिक अपंगत्व असलेली उमेदवार आहे. ती 47 टक्के अपंग आहे. एम्सच्या आठ डॉक्टरांच्या बोर्डानं अपंगत्व प्रमाणपत्र (Disability Certificate) दिलंय. यात फ्रॉड कुठे आहे? असा सवाल तिच्या वकिलांनी केला.पूजा खेडकर किंवा तिच्या आईवडिलांनी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही. नाव बदलल्यानंतर प्रत्येकवेळी ते गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आलंय. असा दावाही वकिलांनी केला. पूजा खेडकर फ्रॉड नाही, तर फायटर आहे. ती दिव्यांग आहे. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता, असा दावा पूजाच्या वकिलांनी केला.
इतकंच नाही तर पूजाच्या वडिलांनी थेट जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावरच गंभीर आरोप केले. डॉ. दिवसे यांनी पूजाचा लैंगिक छळ केला. त्याची तक्रार दिल्यामुळंच तिला टार्गेट करण्यात आलं, असा प्रत्यारोप पूजाच्या वडिलांनी केला होता.
IAS प्रशिक्षणार्थीपद रद्द
बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सनदी अधिकारी बनू इच्छिणाऱ्या पूजा खेडकरला केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा दणका दिला. पूजा खेडकरला दोषी ठरवून, तिचं IAS प्रशिक्षणार्थीपद रद्द करण्याचा निर्णय UPSC नं घेतलाय. एवढंच नव्हे तर UPSC परीक्षा देण्यावर तिला आजीवन बंदी करण्यात आलीय. त्यामुळं खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावून मिरवणाऱ्या आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अरेरावी करणाऱ्या पूजा खेडकर आणि कुटुंबीयांना 440 व्होल्टचा मोठा झटका बसलाय..
मनोरमा खेडकरही अडचणीत
दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावरचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला असून, पुण्यातील शिवाजी नगर कोर्ट यावर शुक्रवारी म्हणजे 2 ऑगस्टला निर्णय देणार आहे. शेतकऱ्याला धमकावल्याचं हे प्रकरण आहे. सुनावणीवेळी मनोरमा खेडकर यांच्यावर लावलेली सगळी कलम जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला. तसंच त्या महिला असून त्यांचं वय 60 वर्षं आहे. त्या आजारी असतात त्यामुळे त्यांना जमीन देण्यात यावा अशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली. यावर सरकारी वकिलांनीही आपली बाजू जोरदारपणे मांडली. मनोरमा खेडकर यांनी सार्वजनिक ठिकाणी पिस्तुल दाखवलं. त्यांच्याकडे त्याचा परवाना आहे मात्र त्यालाही काही नियम असतात, याकडे सरकारी वकिलांनी लक्ष वेधलं. त्यानी शेतात जाताना हत्यार नेलं त्यातूनच त्यांचा हेतू लक्षात येतो अस सरकारी वकील म्हणाले. मनोरमा खेडकर यांनी गुंड किंवा बाऊन्सर आणले होते त्यांनाही ताब्यात घ्यायचं असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. तसंच त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली.