मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही भागात पारा 42 अंशावर जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
एप्रिल-मे महिन्यात उष्ण लहरींचं प्रमाण वाढतं राहण्याची सर्वाधिक शक्यता नासानं नोंदवली आहे. हवामान खात्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य भारत, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ही वाढ 0.5 अंशांची असेल. तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार भारत हवामानाच्या संदर्भात धोक्याच्या सातव्या स्थानावर आहे. वाढत्या उष्णलहरींचा पावसालाही फटका बसणार आहे.
राज्यात आता उष्णतेचा कहर वाढत आहे. शनिवारी राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान हे 40 अंशांच्या वर होतं. मुंबईत देखील 40.9 ते 41.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच घामाघूम होत आहेत.
कोकणात देखील उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उष्णतेची लाट पाहायला मिळाली. येथे 42 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. कोकणातील लोकांनी भंयकर अशा उष्णतेचा अनुभव घेतला. यामुळे दुपारच्या वेळी बाहेर वर्दळ कमी झालेली दिसली.
येत्या काही दिवसात तापमानाचे नवनवे विक्रम नोंदवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. उष्णाघात टाळण्यासाठी लोकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे.
- उष्णता वाढत असल्याने अधिक प्रमाणात पाणी प्या. तहान लागली नसली तरी थोडे-थोडे पाणी पीत राहा.
- आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती तयार केलेली पेय लिंबू पाणी, लस्सी, ताक, उसाचा रस, ओआरएस घ्यावे.
- हलक्या रंगांचे, ढिल्ले आणि कॉटनचे कपडे वापरा.
- दुपारच्या वेळेत बाहेर पडू नका. उन्हात डोके झाका, तोंडाला रूमाल लावा आणि छत्रीचा वापर करा.
- कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा.
- घर स्वच्छ ठेवा. पाण्याचा अपव्यय टाळा. जेणेकरुन येत्या काळात पाण्याची कमतरता भासणार नाही.