सिंधुदुर्ग : आगामी निवडणुकांसाठी भाजपा-शिवसेना युतीची घोषणा करण्यात आल्यानंतर तळकोकणातही भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळते आहे. एवढंच नाही तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी देखील त्यांची सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. युतीच्या जागावाटपात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाणार असून, तिथून शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. मात्र राऊत यांच्या उमेदवारीला विरोध असल्यानं येत्या २५ फेब्रुवारीला आंगणेवाडी यात्रेच्या दिवशी प्रमोद जठार हे भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे इतक्या दिवस भाजपच्या गोटात असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या काही जागा लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपसोबत जवळीक वाढल्यानंतर त्यांना भाजपने खासदारकी दिली होती. गेल्या चार वर्षांपासून एकमेकांव टीका करणाऱ्या शिवसेना आणि भाजपची युती होताच राणेंचा पत्ता आपोआपच कट झाला असल्याची चर्चा आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीमधून वगळण्यासाठी ते भाजपला कळवणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
युती झाल्यानंतर इच्छूक उमेदवारांमध्य़े नाराजी आहे. कारण अनेकांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केली होती. पण युती झाल्यामुळे शिवसेना किंवा भाजप पैकी एकाच पक्षाच्या उमेदवाराला तिकीट मिळणार आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवार येणाऱ्या काळात पक्षाविरुद्ध बंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. युती झाल्यानंतर नेत्यांनी मतदारसंघावर दावा ठोकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत युतीला आपल्याच पक्षातील नाराज नेत्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागू शकतं.