PM Modi Solapur Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापुरात 15 हजार श्रमिकांना घरांचे वाटप केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विठ्ठलाला आणि सिद्धेश्वराला नमन करत आपल्या भाषणाची सुरुवात केली. गृह प्रकल्पाला पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले होते. तसेच यावेळी त्यांनी सोलापुरातील आठवणी देखील सांगितल्या.
"महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांसाठी आज दोन हजार कोटी रुपयांचे सात अमृत प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. मी महाराष्ट्रातल्या लोकांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींमुळे महाराष्ट्राचा गौरव होत आहे. हे ऐकायला खूप चांगले वाटते. प्रगतीशील सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव होत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रास अभिनंदनास पात्र आहे. सोलापुरातल्या हजारो मजुरांसाठी आम्ही जो संकल्प केला होता तो आज पूर्ण होत आहे. आज पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशाच्या सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन झालं आहे. मी ती घरं जाऊन पाहून आलो. ही घरं पाहिल्यानंतर मला देखील वाटलं मला पण बालपणी अशा घरात राहायची संधी मिळायला पाहिजे होतं. या गोष्टी पाहून मनाला आनंद होत आहे. हजारो कुटुंबाची स्वप्ने जेव्हा पूर्ण होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी गॅरंटी दिली होती की उद्घाटनालासुद्धा मीच येणार. आज मोदींनी गॅरंटी पूर्ण केली आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"लाखो रुपयांची ही घरे तुमची संपत्ती आहे. ज्या कुटुंबांना ही घरे मिळाली आहेत त्यांच्या अनेक पिढ्या बेघर राहिल्या आहेत. मला विश्वास आहे की या घरांसोबत तुमच्या मुलांना तुम्ही जे पाहिलं ते पाहावं लागणार नाही. 22 जानेवारीला तुम्ही जी रामज्योती पेटवणार आहात त्याने तुमच्या जीवनात गरिबीचा अंधार दूर करण्याची प्रेरणा मिळेल. तुमचं जीवन आनंदाने, सुखाने भरलेलं असावं ही प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आहे. आमचं सरकार पहिल्या दिवसापासून रामाच्या आदर्शावर चालून देशात चांगले प्रशासन आणि प्रामाणिकपणाचे राज्य असावे यासाठी प्रयत्न करत आहे. हे रामराज्य आहे ज्यामध्ये सर्वांच्या विकासाची प्रेरणा दिली आहे. 2014 मध्ये सरकार आलं तेव्हाच मी सांगितलं होतं की माझं सरकार गरिबांना समर्पित सरकार आहे. त्यामुळे आम्ही एका मागून एक अशा योजना लागू केल्या ज्यामुळे गरिबांच्या जीवन सोप्प होईल. घर, शौचालय नसल्यामुळे गरिबांना अपमान सहन करावा लागत होता. त्यामुळे आम्ही घर आणि शौचालयाच्या बांधकामावर भर दिला. नव्या घरात राहायला जाणाऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही मोठी स्वप्ने पाहा. मोदीची गॅरंटी आहे की तुमचं स्वप्न हा माझा संकल्प आहे," असेही आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं.
"आपल्या देशात बराच काळापासून गरिबी हटावच्या घोषणा देण्यात आल्या. पण या घोषणांमुळेही गरिबी दूर झाली नाही. अर्धी भाकरी खाऊ असे सांगायचे. पण असं का? लोक अर्धी भाकरी खाऊ आणि तुम्हाला मत देऊ असं सांगायचे. पण अर्धी भाकरी का खायची. मोदी आहे तर पूर्ण भाकरी खायला मिळणार आहे. जनतेचे हेच स्वप्न आहे. हाच फरक आहे. माझे सोलापूर सोबत जवळचे संबंध आहेत. अहमदाबादमध्ये पद्मशाली समाजाची अनेक कुटुंबे राहतात. माझं नशीब होतं की पूर्वी मला महिन्यातून तीन ते चार वेळा पद्मशाली समाजाचे लोक जेवायला घालत होते. छोटं घर असायचं पण मला कधी उपाशी पोटी झोपू नाही दिलं," असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
"बराच वेळ गरिबी हटावच्या घोषणा देण्यात आल्या. पण या घोषणांनंतरही गरिबी गेली नाही. याचे सगळ्यात मोठं कारण म्हणजे गरिबांच्या नावावर योजना आणल्या जायच्या पण त्याचा लाभ योग्य लोकाना मिळत नव्हता. आधीच्या सरकारमध्ये गरिबांच्या हक्काचा पैसा मध्येच लुटला जायचा. आधीच्या सरकारची निती आणि निष्ठा चुकीची होती. पण आमची निती स्वच्छ आहे. आमची निष्ठा देशाप्रती आहे. भारताला विकसित राष्ट्र करण्यात आहे. मोदीनी गॅरंटी दिली की सरकारी लाभ हा थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार. लाभार्थ्यांच्या मध्ये असणाऱ्या बाजूला करण्याचे काम केलं. गेल्या दहा वर्षात 30 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे गरीब, शेतकरी आणि युवकांच्या खात्यात जमा केले. जनधन, आधार आणि मोबाईल कवच बनवून जवळपास 10 कोटी बोगस लाभार्थ्यांना बाजूला गेलं. ज्यांचा जन्म सुद्धा झाला नाही ते तुमचे पैसे खात होते. आमच्या सरकारने काम सुरु केलं तेव्हा त्याचे परिणाम समोर आले. आमच्या सरकारच्या काळात 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
"देशातील 25 करोड लोकांनी गरिबीला हरविले आहे. गरिबांना साधन सामग्री मिळाली तर ते गरिबीला हरवू शकतात. येत्या पाच वर्षात जे गरिबी मधून बाहेर आलेत, त्यांना अधिक बळ देण्याचा प्रयत्न असेल. कारण त्यांना पुन्हा गरिबी मध्ये जावू द्यायचे नाही. माझ्या पुढील कार्यकाळात भारत देशाचा जगातील तीन अग्रगण्य देशात समावेश होईल ही माझी गॅरंटी आहे आणि हे तुमच्या मुळे शक्य होईल," असे पंतप्रधानांनी सांगितलं.