सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

गेल्या 2 वर्षांत गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी मोठ्या प्रमाणात कामं केल

Updated: Oct 29, 2021, 09:53 AM IST
 सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी title=

मुंबई :गडचिरोलीचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. सात दिवसांपूर्वी धमकीचं पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आलं असून अधिका-यांच्या जीवालाही धोका आहे. यासंबधीची तक्रार ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आल्याची माहिती 'झी 24 तास'ला गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

नक्षवाद्यांकडून शिंदे यांना धमकीचे पत्र

मंत्री एकनाथ शिंदे यांना 7 दिवसांपूर्वी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले. त्यासंबधीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. नक्षलवाद्यांकडून शिंदे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात त्यांच्यासह कुंटुंबियांना जीवे मारण्याची धमकी किंवा जिवघेणा हल्ला होऊ शकतो अशी धमकी देण्यात आली आहे. 

विकासकामांचा नक्षलवाद्यांमध्ये राग

मंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील काही परिसर नक्षलग्रस्त भागात मोडतो. जिल्ह्यात शिंदे यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात मुलभूत सुविधा वाढवण्यात आल्या. पक्क्या रस्त्यांची तसेच इतर विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली.

जिल्हातील नक्षलवाद्याच्या उपद्रवामुळे बंद झालेले काही Mining projects शिंदे यांनी पुन्हा सुरू केले. त्याचा राग नक्षलवाद्यांमध्ये आहे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच नक्षलवादी परिसरात मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा सुरू करण्यात आल्या.त्यामुळे स्थानिकांकडून नक्षलवाद्यांचे समर्थन कमी होत असल्याचे दिसून येत होते.

एवढेच नाही तर 25हून अधिक नक्षलवाद्यांनी सरकार समोर समर्पन केलं होतं. त्यासाठीही 10 कोटींची विशेष योजना शिंदे यांनी राबवली होती. 

गडचिरोलीतील विकास कामांचा राग मनात ठेऊन. मंत्री शिंदे, कुटुंब, जवळचे अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी नक्षलवाद्यांकडून देण्यात आली आहे.

शिंदे यांना मिळालेल्या धमकीविषयीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनादेखील देण्यात आली आहे. धमकीच्या पत्राबाबत ठाण्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यासंबधीचा गुन्हादेखील पोलिसांनी दाखल करून घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.