निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : पुण्याहून (Pune News) वरंधघाट मार्गे (varandha ghat) कोकणात जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक कार थेट नीरा देवघर धरणात (Niradevghar Dam) कोसळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले आहे. यासोबतच स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा सध्या शोध सुरु करण्यात आला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमुळे पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंध घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही काही अतिउत्साही पर्यटक या मार्गाने प्रवास करत आहेत. अशाच काही तरुणांना वरंध घाटमार्गे प्रवास करणे चांगलेच महागात पडलं आहे. घाटाजवळील धरणात गाडी कोसळल्याने तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एकजण बचावला आहे.
पुण्याहून वरंधघाट घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावर, बलेनो कार नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक तरुण वाचला आहे. रावेत येथून चौघे फिरायला निघाले होते. दरम्यान धुके आणि पाऊस असल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने गाडी थेट 200 फूट धरणाच्या पाण्यात पडली. संकेत जोशी (वय 26, रा. बाणेर) असं वाचलेल्या युवकांच नाव आहे. तर अक्षय रमेश धाडे, स्वप्निल शिंदे आणि हरप्रित यांचा गाडीत अडकून मृत्यू झाला आहे.
सकाळी साडेनऊच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. धरणात गाडी कोसळ्यानंतर चालक कसातरी बाहेर आला. मात्र सीटबेल्ट असल्याने इतर तिघांना बाहेर पडता आलं नाही. भोर महाड मार्गावरील वरंध घाटात शिरगाव गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले होते.
बुलढाण्यात बस अपघातात सहा जणांचा मृत्यू
बुलढाण्यात दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडलाय. बुलढाण्याच्या मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर धडकल्या. शनिवारी सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावर हा अपघात घडला आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही ट्रॅव्हल पैकी एक अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तीर्थयात्री होते. तर दुसरी ट्रॅव्हल नागपूरवरून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे.जखमी प्रवाशांना तात्काळ मलकापूर उपजिल्हा रुगणालयात दखल करण्यात आले आहे.