पुणे : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 तरुणांची फसवणूक; आरोपीला तमिळनाडूतून अटक

Pune Crime :  सैन्यात भरती होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या 15 तरुणांची पुण्यात एका बनावट आर्मी ऑफिसरने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी या आरोपीला तमिळनाडूतून अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 13, 2023, 03:55 PM IST
पुणे : सैन्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 15 तरुणांची फसवणूक; आरोपीला तमिळनाडूतून अटक title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) वानवडी येथे आर्मी भरतीचा सराव करणाऱ्या 12 ते 15 युवकांना आर्मी मध्ये नोकरी लावतो अस सांगून जवळपास 12 लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याची घटना घडली आहे.आर्मीमध्ये नोकरी  देण्याचं आमिष दाखवून फसववणूक करणाऱ्या या बनावट आर्मी ऑफिसरला लष्करी गुप्तचर पथक आणि वानवडी पोलिसांनी (Pune Police) संयुक्त कारवाई करुन मंगळवारी मध्यरात्री तामिळनाडूमधून अटक करण्यात आली आहे. 

संबंधिक आरोपीने  अनेक तरुणांना आर्मीमध्ये नोकरी लावण्याच्या बाता मारून लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. या बनावट आर्मी ऑफिसरने 15 जणांची 12 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक (केल्याचे उघडकीस आले आहे. ऑनलाइन स्वरूपात रोख रक्कम घेऊन फिर्यादी यांच्या पैशाचा वापर आरोपीने  स्वतःच्या फायद्यासाठी करून मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात धोंडीबा राघू मोटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपीत रणजीत कुमार राजेंद्र सिंग याला तामिळनाडूमधून अटक करण्यात आली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते सप्टेंबर 2023 दरम्यान रेस कोर्स वानवडी  येथे घडला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रणजीत कुमार राजेंद्र सिंग हा सातत्याने पुण्यातील वानवडी रेस कोर्स (Race Course Wanwadi)येथे जाऊन आर्मी भरतीचं प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना आर्मी इंटेलिजन्स मध्ये रेकॉर्ड ऑफिसमध्ये काम करीत असल्याबाबत सांगायचा. आर्मी ऑफिसमधील सिकंदराबाद येथे तुमची भरती करतो, असे सांगून फिर्यादींना बनावट अपॉईंटमेंट लेटर दिलं. इतकचं नाही तर स्वतःचे आर्मीचे बनावट आयकार्ड व इतर बनावट कार्ड दाखवून विश्वास संपादन केला. 

दरम्यान, आरोपीने दिलेले अपॉईंटमेंट लटर बनावट असून आपली आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे, असे फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या लक्षात आले. फसवणूक झालेल्यांनी 26 सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत आरोपीला तमिळनाडू येथून अटक केली आहे. आरोपीवर आयपीसी 406, 420, 467, 468, 471, 470, 171 प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.