सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराने (lender) एका व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. आरोपी सावकाराने पीडितेवर अत्याचार करताना पतीला समोरच बसवलं होतं. त्यानंतर आरोपीने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ तयार करून हा तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे. पोलिसांनी (Pune Police) या प्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. एका 34 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47) याच्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तब्बल सहा महिन्यांनी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
पीडित महिलेच्या पतीला आरोपीला इम्तियाज हसीन शेख याने उसने पैसे दिले होते. उसने घेतलेले पैसे फिर्यादीचा पती परत करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला समोर बसून चाकूचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने त्याच्या पत्नीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले.
धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण घटनेचा आरोपीने मोबाईलमध्ये व्हिडिओ देखील तयार केला होता. त्यानंतर पुन्हा आरोपीने फिर्यादी महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपी इम्तियाज हसीन शेख याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन टाकले. दरम्यान हा प्रकार समजताच पीडितेने तात्काळ हडपसर पोलीस ठाणे गाठले आपली तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.