हिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलमध्ये तोडफोड, Video व्हायरल

पुण्यात पोलीस कारवाईनंतरही कोयता गँगची दहशत कमी होताना दिसत नाहीए, भरदिवसा हातात कोयते घेऊन हॉटेलमध्ये केली तोडफोड

Updated: Jan 6, 2023, 08:55 PM IST
हिंदुंची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? पुण्यात कोयता गँगकडून हॉटेलमध्ये तोडफोड, Video व्हायरल title=

Pune Crime News : पुण्यात (Pune Police) काही दिवसांपूर्वी काही दिवसांपूर्वी दोन पोलीसांनी कोयता दाखवत दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाचा पाठलाग करुन त्याला तुडवल्याचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर पोलिसांचं कौतुकही करण्यात आलं. पण यानंतरही पुण्यात कोयता गँगची दहशत काही संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात कोयता गँगने (Koyta Gang) धुमाकूळ घातला आहे. कोयता गँगच्या दहशतीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. पाच ते सहा जणांच्या टोळीने हातात कोयता घेत हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. 

काय आहे नेमकी घटना?
पुणे शहरातील भवानी पेठेतील (Pune Bhawani Peth) ही घटना असून तुमची हिंदुची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असं म्हणत कोयता गँगकडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची (Nisha Restaurant) तोडफोड करण्यात आली. याबाबत लष्कर पोलीस पोलीस स्टेशनमध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मोनिष म्हेत्रे यांनी तक्रार दाखल केली आहे. 

तक्रारदार मोनिष म्हेत्रे हे त्यांच्या कुटुंबासह भवानी पेठेत राहत असून ते राहत असलेल्या बिल्डींगचे तळमजल्यावर त्यांच्या मालकीचं निशा रेस्टॉरेन्ट आहे. हॉटेल सकाळी 07 ते रात्री उशीरापर्यंत सुरु असतं.  हॉटेलमध्ये चहा नाष्टा तसंच इतर खादय पदार्थांचीही विक्री केली जाते. गुरुवारी 5 जानेवारीला दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेलमध्ये गर्दी कमी होती. संतोष आणि अझीम नावाचे वेटर हॉटेलमध्ये काम करत होते. याचवेळी पाच ते सहा तरुण हॉटेलमध्ये घुसले.

या तरुणांनी तोंडाला रुमाल बांझला होता. त्यांच्या हातात, कोयता, हॉकी आणि लोखंडी रॉड होते. दुचाकीवरुन आलेल्या या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसत तोडफोड सुरु केली. हॉटेल चालक मोनिष म्हेत्रे हे हॉटेलच्या बाहेर बसले होते, तिथे जात काही तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली. तसंच हिंदुंची हॉटेल चालवण्याची तुमची औकात आहे का? असा दम दिला. सर्व तरुण साधारण 25 ते 26 वयोगटातील होते. याप्रकरणी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे

पुण्यात गुंडांची दहशत
काही दिवसांपूर्वी पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन युवकांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण केली होती. या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि गुंडांना चांगलाच इंगा दाखवला. गुंड कोयता घेऊन दहशत माजवत होते. जो मिळेल त्याच्यावर हल्ला करत सुटले होते. काही दुकानांचीही या गुंडांनी नासधुस केली. पण, दोन धडाकेबाज पोलिसांनी पाठलाग करून या गुंडांची सगळ्यांसमोर धुलाई केली.