सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : रक्षाबंधानाच्या (raksha bandhan) दिवशीच पुण्यातील एका कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे (Pune News) पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट खडकवासला धरणाच्या (khadakwasla dam) पाण्यात कोसळली. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. या अपघातात एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी जात असतानाच हा अपघात झाला आहे.
संस्कृती सोमनाथ पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे. मुळशी व सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री उशिरा तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला आहे. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नांदेड सिटी येथे राहणारे सोमनाथ पवार हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न,मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांच्यासह कारने पानशेत या आपल्या मुळ गावी जात होते. कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ अचानक पवार यांच्या कारचे उजव्या बाजूचे टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.
कारच्या अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेले स्थानिक तात्काळ मदतीसाठी धावले. इतरांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशिरा खोल पाण्यात बुडालेली कार शोधून बाहेर काढली. कारमध्ये संस्कृतीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पुणे-पानशेत रस्त्यावर धोकादायक वळणे व सुरक्षेबाबत उपाययोजना नसल्याने अपघात झाल्यानंतर वाहने खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळून आठ ते दहा नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाने अद्यापपर्यंत याबाबत गांभीर्याने दखल घेतलेली नाही.