Pune News : एखाद्या मोठ्या शहरात नोकरीच्या निमित्तानं जा किंवा शिक्षणाच्या. तिथं स्वत:चं घर नसेल तर भाड्यानं घर शोधणं म्हणजे एक मोठा संघर्षच असतो. एकट्या व्यक्तीला घर देताना मुरडली जाणारी नाकंही कमी नसतात. बरं, मुलंमुलं राहताय तर घर नाही मिळणार, मुलींनाच कसं ठेवायचं भाड्याच्या घरात, कुटुंब नाही का? अमुक वेळेत घरी यायचं, तमूक व्यक्तींना घरी नाही आणायचं या आणि अशा अनेक अटी पुढे करतही भाड्याची घरं नाकारली जातात. ही कारणं काही नवी नाहीत. पण, भाड्याची घरं शोधणाऱ्यांपुढं येणाऱ्या अडचणी पाहता आता पालिका प्रशासनाकडूनच या समस्येवर तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी आता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि शहरात येणाऱ्या बाहेरील नागरिकांना सहजपणे भाड्यानं घर उपलब्ध व्हावं यासाठी एक नव्या योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. पुणे महानगरपालिकेच्या 2024 - 25 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला जात असताना त्यांनी या योजनेसंदर्भातील सादरीकरण केलं.
पुण्यामध्ये नोकरी, शिक्षण या आणि अशा अनेक कारणांनी आलेल्या मोठ्या वर्गाला या शहरात वास्तव्यासाठीचं ठिकाण शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता मात्र या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून, सध्या पुणे मगानरपालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर फ्लॅट भाडेतत्त्वावर मिळण्यासाठी पुण्याच्या बाणेर भागामध्ये काही घरं उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं वृत्त पुणे मिररनं प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान, पालिकेच्या या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असं शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितलं. येत्या काळात सदर योजनेविषयीचे नियम, अटी, अर्थार्जनासाठीच्या अटी अशी सर्व माहिती जारी करण्यात येणार आहे. ही योजना सुरु करण्याआधी पालिकेकडून सविस्तर माहिती देण्यात येईल. पुणे पालिकेकडून सुरुवातीपासूनच नागरिकांच्या वास्तव्याच्या दृष्टीनं गृहप्रकल्प योजना राबवण्यात आल्या होत्या. या अंतर्गत सध्या पंतप्रधान आवास योजना आणि एसआरए उपक्रमांअंतर्गत पालिकेकडून अनेक गृहयोजनांवर कामं सुरु आहेत.