चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (ravindra mahajani) शुक्रवारी हे तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी (Pune Police) घराचा दरवाजा तोडल्यानंतर रवींद्र महाजनी यांचा मृतदेह घरात पडलेला दिसला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा मृतदेह घरात पडून होता. मागील काही महिन्यांपासून ते भाडे तत्वावर राहत होते. मात्र शेजारी राहणाऱ्यांना देखील अभिनेते असल्याचे माहिती असले तरी त्यांच्याबाबत जास्त माहिती नव्हती. दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारच्यांची पोलिसांना कळवले होते.
अभिनेते महाजनी हे गेल्या आठ महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा हॉलमध्ये मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रवींद्र महाजनी हे जास्त कोणाशी बोलत नव्हते अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.
"मी मंगळवारी त्यांना शेवटचे पाहिले होते. कचरा देताना ते माझ्यासोबत बोलायचे. रुमच्या बाहेर वास येत असल्याने माझ्या सरांकडे लोकांनी तक्रार केली. त्यानंतर मी रुमजवळ जाऊन दरवाजा वाजवून आवाज दिला. मी सरांनी कोणीच आतून आवाज देत नसल्याचे सांगितले. मंगळवारी त्यांनी माझ्या हातात कचरा दिला होता. गुरुवारी ते झोपले आहेत असे वाटल्याने मी दरवाजा वाजवला नाही. शुक्रवारी मी दरवाजा वाजवत होते तरी त्यांनी दरवाजा उघडला नाही," असे इमारतीमध्ये साफसफाई करणाऱ्या महिलेने सांगितले.
"आम्हाला ते अभिनेते आहेत हे माहिती होते पण आम्हाला कालच समजलं की ते कोण आहेत. आम्ही मंगळवारीच गावावरुन आलो होतो. त्यानंतर शुक्रवारी घरातून दुर्गंधी येऊ लागली. ते कोणासोबतही बोलत नव्हते. त्यांच्यासोबत कोणीच राहत नव्हते. तसेच त्यांच्या कुटुंबातील कोणीच येत नव्हते. नेहमीच ते एकटे दिसायचे. आठ नऊ महिन्यांपासून ते इथे राहत होते," असे शेजारच्या महिलेने सांगितले.
"शुक्रवारी सकाळपासून वास येत होता. पण त्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. दुपारी 12 वाजल्यापासून दुर्गंध वाढला. याची माहिती मी सुरक्षा रक्षकांना दिली. त्यांनी पोलिसांनी सांगितल्या पोलीस आले आणि त्यांनी दरवाजा उघडला. हॉलमध्ये रवींद्र महाजनी हे पडलेले होते. ते अभिनेते आहेत याची कल्पना होती. पण वयानुसार ते ओळखू येत नव्हते. ते स्वतः गाडी चालवत यायचे जायचे. त्यांच्यासोबत आम्हाला कधीच कोणी दिसले नाही. हाक मारल्यावर फक्त ते नमस्कार म्हणायचे. दुसरं काही बोलणं व्हायचं नाही. त्यांच्या पायाला काहीतरी झाले असल्याने ते थोडे लंगडत चालत होते," असे आणखी एका शेजाऱ्याने सांगितले.