Pune News : मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण... वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं

Pune News : ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीने जीवन संपवल्याने बुधवारी पुण्यात खळबळ उडाली होती. बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली  अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी तरुणीचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे

Updated: Mar 30, 2023, 09:42 AM IST
Pune News : मेहनतीने डॉक्टर होण्याच्या स्वप्न उराशी बाळगलं पण... वडिलांनी कॉलेजमध्ये सोडताच तरुणीने स्वतःला संपवलं title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या (Pune News) बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने ससून रुग्णालयाच्या (Sassoon hospital) इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. वैद्यकीय शिक्षण (Medical Student) घेणाऱ्या या तरुणीने ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

अदिती दलभंजन (20) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दरम्यान, आदितीच्या मृत्यूचे आता धक्कादायक कारण समोर आले आहे. परीक्षेचा अभ्यास न झाल्याने आलेल्या नैराश्यातून एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिकत असलेल्या अदितीने स्वतःला संपवले आहे. अदितीने उचलेल्या टोकाच्या पावलाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

आदिती बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत होती. बुधवारी आदितीची परीक्षा होती. आदितीला महाविद्यालयात सोडण्यासाठी तिचे वडील आले होते. मात्र परीक्षेपूर्वीच आदितीने रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली. ससून रुग्णालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून अदितीने उडी घेतली आणि स्वतःला संपवले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अदितीला तात्काळ उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.

अदिती ही आपल्या आई-वडिलांबरोबर आनंदनगर येथे राहत होती. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या अदितीने अभ्यास करून व चांगले गुण संपादन करुन बी.जे. मेडिकल महाविद्यालयात एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. पण परीक्षेआधी तिचा अभ्यास न झाल्याने तिला नैराश्य आले होते. अदितीने वडिलांना याची कल्पनादेखील दिली होती. मात्र बुधवारी अदितीने टोकाचा निर्णय घेतला आणि आत्महत्या केली. वडिलांनी परीक्षेसाठी कॉलेजमध्ये सोडल्यानंतर अदिती ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर गेली आणि तिने खाली उडी घेतली.

दरम्यान, अदितीने आत्महत्या करताना तिचा मोबाईल टेरेसवरच ठेवला होता. पोलिसांनी टेरेसवर जाऊन मोबाईल ताब्यात घेतला.  बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.