बिल्डिंगला लटकून जीवघेणं Reel शूट करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Shocking Pune Grip Strength Check Reel Video: पुण्यात रिलसाठी एक तरुणीने बिल्डिंगला लटकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 21, 2024, 05:50 PM IST
बिल्डिंगला लटकून जीवघेणं Reel शूट करणं पडलं महागात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई title=

Shocking Pune Grip Strength Check Reel Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात जीवघेणा स्टंट करणं तरुण-तरुणीला महागात पडलं आहे. पुणे पोलिसांनी स्टंट करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये कलम 308 चा समावेश आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. 

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कात्रज हायवेवर स्वामीनारायण मंदिराजवळ एक पडकी इमारत आहे. 3 ते 4 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला होता आणि काल रील व्हायरल झाली होती. त्यावेळी त्यांची नावं निष्पन्न झाली नव्हती. यामुळे अनोळखी इसमांविरोधात 336 आणि 334 नुसार गुन्हा दाखल केला होता. नंतर ओळख पटल्यानंतर संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली. हा गंभीर प्रकार असल्याने 308 कलमही लावण्यात आलं आहे. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत".

"सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना त्याचा संपूर्ण समाजावर परिणाम होत असतो याची जाणीव ठेवावी. एखादा त्याचं अनुकरण करु शकतो आणि जीव गमावू शकतो. नागरिक, तरुण-तरुणींनी अशा पोस्ट शेअर करताना काळजी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल," असा इशारा यावेळी त्यांनी दिला. 

काल दुपारी गुन्हा दाखल केला तेव्हा त्यांची ओळख पटली नव्हती. मात्र नंतर इंस्टाग्राम आयडीवरुन ओळख पटवण्यात आली. ते लोक पोलीस स्थानकात आले होते. त्यांना समज आणि नोटीस देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

काय आहे या व्हिडीओमध्ये?

पुण्यातील एका तरुण-तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पुणे-बंगळुरु महामार्गाजवळील एका पडीक इमारतीवर शूट करण्यात आला आहे. या पडीक अवस्थेमधील इमारतीवर चढून तरुण आणि तरुणी संस्टबाजी करताना दिसत आहेत. ग्रीप स्ट्रेंथ चेक म्हणजेच हाताची पकड किती घट्ट आहे हे तपासून पाहण्यासाठी स्टंटबाजी करत असल्याची कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. दोन ते तीन मजल्यांइतक्या उंचीवरुन ही तरुणी तरुणाचा हात पकडून अधांतरी लटकत असल्याचं दिसत आहे.

पुण्याकडून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर चढून ही स्टंटबाजी करण्यात आली आहे. हा परिसर स्वामी नारायण मंदिराजवळच आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांबरोबर त्यांचा हा स्टंट शूट करणारा एक तरुणीही व्हिडीओत दिसत आहे. पूर्ण तयारीने हे तिघे इमारतीवर चढले होते, असं दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवरुन तरुण-तरुणीवर टीका केली आहे.

दरीत कार पडून एका तरुणीचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच संभाजीनगरमध्ये दरीपासून काही अंतरावर कारमध्ये रील शूट करण्याच्या नादात मोठी दुर्घटना घडली होती. या तरुणीने रिल शूट करण्याच्या नादात ब्रेकऐवजी एस्केलेटर दाबल्याने कार रिव्हर्स जाऊन दरीत पडली होती. या अपघातामध्ये तरुणीला जीव गमावावा लागला होता.