महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, सुनील तटकरे यांची शिवसेनेवर जोरदार टीका

Raigad Nagar Panchayat Election : जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली आहे. आता भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

Updated: Jan 27, 2022, 01:39 PM IST
महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता, सुनील तटकरे यांची शिवसेनेवर जोरदार टीका title=

प्रफुल्ल पवार / रायगड : ,Raigad Nagar Panchayat Election : जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपची मदत घेतली आहे. आता भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकीत याचा वचपा काढा, असे जाहीर आदेश खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याचवेळी शिवसेनेवर टीका केली. (Sunil Tatkare criticized on Shiv Sena) त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सोयरीक झाली आहे. मात्र रायगड जिल्ह्यात जुळत नसल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आला आहे. माणगाव नगरपंचायतीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्याची गंभीर दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेऊन भविष्यात जिल्‍हयातील राजकारणात शिवसेने सोबत दोन हात करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. 

आता रायगड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे याची सुरूवात निजामपूर येथे बुधवारी संध्याकाळी झालेल्या मेळाव्यातून करण्यात आली. माणगाव तालुक्‍यातील निजामपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी मेळावा आयोजित केला. यासमारंभात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या रायगड जिल्‍हयातील कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. 

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याचे माहिती असतानाही त्यांच्या वरती अश्लाघ्य भाषेत टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राज्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षांनी आपापल्या परीने उत्तर दिले. मात्र माणगावमधील एक नगर पंचायत मिळावी म्हणून शिवसेनेने याच भारतीय जनता पक्षाची मदत घेतली. राजकारणात इतकी लाजिरवाणी परिस्थिती मी पाहिली नाही. पक्ष प्रमुखांवर टीका आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करणारी भाजप मतांसाठी शिवसेनेला चालते. ही लोकं पक्षाजवळ काय निष्ठा ठेवणार, अशा शब्दांत तटकरे यांनी सेनेला फटकारले. 

माणगाव नगर पंचायतीत झालेल्या पराभवाचा वचपा आता राष्ट्रवादी काढल्याशिवाय राहणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.    खासदार सुनील तटकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता जिल्‍हयातील सेना राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला गेला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याबाबत आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.