Raj Thackeray Takes Dig At Uddhav Thackeray Group: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम मागील 17 वर्षांहून अधिक काळापासून रखडल्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांबरोबरच वारंवार त्याच सत्ताधाऱ्यांना निवडून देणाऱ्या मतदारांना दोष दिला आहे. राज ठाकरेंनी अगदी या रस्त्याच्या बांधकामासाठी किती खर्च झाला, मागील 10 वर्षांमध्ये किती जणांचा मृत्यू झाला यासारख्या आकडेवारीसहीत सविस्तर मुद्दे आपल्या भाषणातून मांडले. राज ठाकरेंनी खड्ड्यांमधून जाणाऱ्या लोकांकडून वारंवार त्याच लोकांना निवडून दिलं जात याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. दरवेळेस महत्त्वाच्या मुद्द्याऐवजी निवडणुकीच्या तोंडावर इतर गोष्टींना प्राधान्य देत मतदान केलं जात आणि पुन्हा तेच टेंडर, भ्रष्टाचार, टक्केवारीचं दुष्टचक्र सुरु राहतं असं राज म्हणाले. यावेळेस राज यांनी थेट उल्लेख न करता उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केलं.
"नितीन गडकरी, मुख्यमंत्र्यांनी मुंबई गोवा महामार्ग 2024 पर्यंत लोकांसाठी खुला होईल असं सांगितलं आहे. याचा मला आनंद आहे. पण आताच्या गणपतीचं काय. आतापर्यंत या मार्गावर 2500 माणसं गेल्या 10 वर्षात मृत्यूमुखी पडली आहेत. याचं काय कारण? आम्ही गावी जात होतो, सहज फिरायला जाताना अपघात घरचे मृत्यूमुखी पडतात. कधी गाड्यांचे टायर फुटतात तर कधी गाड्या वेड्यावाकड्या होतात. पण काही नाही सगळे ढिम्म. याचं एकच कारण आम्ही कसेही वागलो, काहीही केलं कसेही रस्ते केले तरी भलत्या विषयावर हे आपल्याला मतदान करुन मोकळे होणार. निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काढून मतं मिळवतात. हा धंदा आहे," अशी टीका राज ठाकरेंनी केली.
"एखादा रस्ता 20-25 वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे? तो 6 महिन्यात खराब झाला पाहिजे. नवं टेंडर, नवे पैसे, नवं कंत्राट, नवे टक्के. हे एकमेकांवर ओरडत आहे ना खोके खोके खोके..!! जे खोके खोके ओरडतात त्यांच्याकडे कंटेनर आहेत. त्यांनी कोव्हिड पण सोडला नाही. हेच लोक निवडणुकीच्या तोंडावर येणार मतं मागायला," असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली. "प्रत्येक वेळेस बाळासाहेबांचं नाव पुढे करायचं. मग आपण इमोशनल होऊन करतो मतदान," असं म्हणत राज यांनी भावनिक राजकारणावरुन टीका केली.
नक्की वाचा >> Video: 'मोदींनी 70 हजारांचा घोटाळा काढला अन्...'; अजित पवारांची मिमिक्री करत राज ठाकरेंचा टोला
"आतापर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर यावर खर्च झालेला पैसा 15566 कोटी रुपये इतका आहे. रस्ता झालेला नाही. मी नितीनजींना फोन केला तेव्हा म्हणालो राज्याकडून होत नसेल तर केंद्राकडून बघा. मला म्हणाले मी लक्ष घातलं पण कंत्राटदार पळून गेलेत. काहीजण कोर्टात गेलेत. मी म्हटलं हा काय प्रकार आहे. या सगळ्या गोष्टींमागे काही कारण तर नाही ना? यामागे कोणाचं काही काम तर सुरु नाही ना?" अशी शंका राज यांनी उपस्थित केली.
नक्की वाचा >> BJP ने मुलावर केलेल्या टीकेने राज ठाकरे खवळून म्हणाले, 'भाजपाने दुसऱ्यांचे आमदार...'
"मुंबई-गोवा महामार्गाबद्दल फडणवीसांशी बोललो. ते म्हणाले नितीनजींशी बोलून घ्या. मी त्यांच्याशीही बोललो. मुंबईवरुन रत्नागिरीला जायचं असेल तर यू-टर्न मारुन जावं लागतंय. मुंबईवरुन पुण्याला, पुण्यावरुन साताऱ्याला आणि सातऱ्यावरुन खाली या. जेव्हा रस्ता बनत नव्हता तेव्हा जास्त चांगला होता. लोक पोहचत तरी होते," असा टोला राज ठाकरेंनी लगावला.