औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरे यांना पुण्यातील तब्बल १०० गुरुजी देणार शुभ आशीर्वाद

राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. पण त्याआधी पुण्याच महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: Apr 29, 2022, 09:42 PM IST
औरंगाबादच्या सभेआधी राज ठाकरे यांना पुण्यातील तब्बल १०० गुरुजी देणार शुभ आशीर्वाद title=

पुणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादच्या सभेसाठी मनसेकडून (MNS) जोरदार तयारी सुरू आहे. पुण्यात दाखल झालेल्या राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी उद्या सकाळी तब्बल १०० गुरूजी त्यांच्या राजमहाल या निवासस्थानी येणार आहेत. हा आशीर्वाद सोहळा संपल्यानंतर ते वढू बुद्रुकला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. तिथूनच ते पुढे औरंगाबादला मार्गस्थ होणार आहेत. 

पुण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांनी या सर्व कार्यक्रमाची आणि औरंगाबादपर्यंत प्रवासाची तयारी पूर्ण केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी पुण्यातून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. त्याआधी पुण्यातील 100 गुरुजींच्या उपस्थितीत आशीर्वाद पर धार्मिक विधी होणार आहे.

राज ठाकरे यांच्या सभेमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सभास्थळाची पाहणी केली. उद्या दुपारपर्यंत सभेची सर्व तयारी पूर्ण होईल अशी माहिती सरदेसाई यांनी यावेळी दिली.

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. राज ठाकरे येत्या 1 तारखेला औरंगाबादला सभा घेणार आहेत. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने 16 अटी घालून दिलेल्या आहेत.