प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : मुलीच्या छेडछाड (molestation) प्रकरणात आरोपी असलेल्या एका रिक्षा चालकाने शनिवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीत (Ratnagiri Crime) घडला आहे. रिक्षा चालकाने उचलेल्या टोकाच्या पावलामुळे एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारानंतर आता आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये रिक्षाचालकाने मुलीवरच गंभीर आरोप केले आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे लोकांच्या मनात वेगळीच शंका निर्माण झाली आहे. दरम्यान पोलीस (Ratnagiri Police) या प्रकरणाची काय दखल घेतात याकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे.
महाविद्यालयीन तरुणीच्या विनयभंगाच्या तक्रारीत अटक झालेला आणि जामीन मंजूर झालेला रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याने शनिवारी पहाटे गळफास घेत आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मी दुपारी महाविद्यालयातून घरी जात असताना रिक्षाचालकाने आपल्याशी गैरवर्तन केले आणि अश्लील संभाषण केले असे तरुणीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. सोशल मीडियावरील ही पोस्ट समोर येताच पोलिसांनी याची दखल घेत तरुणीशी संपर्क साधला आणि तिची तक्रार नोंदवून घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासांतच रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला अटक केली होती. अटकेनंतर जामीनावर बाहेर आलेल्या रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
त्यानंतर आता या रिक्षाचालकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये हा रिक्षा चालक मानसिक तणावात दिसत असून मुलीने ब्लॅकमेल केले आणि पैशांची मागणी केली असा दावा रिक्षा चालकाने केला आहे. आत्महत्यापूर्वी काही दिवस अगोदर हा व्हिडिओ शूट केला गेलेला असावा असा अंदाज आहे. मात्र अविनाश म्हात्रेच्या आत्महत्येनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलीच्या इंस्टाग्राम पोस्ट नंतर रिक्षाचालक अविनाश म्हात्रे याला अटक केली होती. 22 जून रोजी त्याची जामीनावर सुटका झाली होती. दरम्यान अविनाश म्हात्रे याने गळफास घेतल्याची बाब शनिवारी म्हणजेच 24 जून रोजी सकाळी समोर आली. त्यानंतर या रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या रिक्षाचालकाने तरुणीवर काही गंभीर आरोप केलेले आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
"मी अविनाश म्हात्रे. मला त्या मुलीने फसवून पैशांची मागणी केली. म्हणून मी आत्महत्या करत आहे. या आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नसून ती मुलगी जबाबदार आहे. कारण तिने मला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी केली. त्या मुलीने माझ्याबद्दल भरपूर काही वाईट सांगितलं आहे. ती माझ्या कडून पैसे उकळत आहे. ती माझ्याकडून पैसे मागत होती," असे अविनाश म्हात्रेने आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.