Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का

Ratnagiri Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र दिसून आले.

Updated: Dec 21, 2022, 11:43 AM IST
Ratnagiri Gram Panchayat Election  : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाचे वर्चस्व, पालकमंत्री उदय सामंत यांना धक्का title=

Ratnagiri Gram Panchayat Election Result : रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. (Gram Panchayat Election Result  2022) ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. दरम्याम, शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेही मुसंडी मारल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. मात्र, पालकमंत्री आणि उदयोगमंत्री उदय सामंत यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. (Ratnagiri Gram Panchayat Election Result  2022) निवडणुकीच्या आधी रत्नागिरी तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित 800 कोटी रुपयांच्या विकास कामांचा धडाका लावणारे सामंत या निवडणुकीत आपला करिष्मा दाखवू शकलेले नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यात 222 ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी, गुहागर, खेड, चिपळूण येथे ठाकरे गटाची चांगली ताकद दिसून आली. मात्र, दापोली आणि मंडणगड येथे शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले. आमदार योगेश कदम यांनी मंडणगड आणि दापोलीत ग्रामपंचायतीत चांगले यश मिळवले. तर गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाचे वर्चस्व कायम राखले. तर राजापूर आणि लांजामध्ये ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्याकडे राखण्यात यश राखले आहे. तर चिपळूणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी आघाडीला चांगले यश मिळाले.

ठाकरे गटाच्या शिवसेनेने बाजी मारली आहे. यात उद्धव ठाकरे गटाने 101  ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व राखले आहे. तर शिंदे गटाला 45 ठिकाणी यश मिळाले आहे. तर भाजपला 17 ठिकाणी सत्ता मिळाली असून 47 ठिकाणी गाव पॅनल विजय झाले. तर 8 ठिकाणी राष्ट्रवादीने यश मिळवले. दापोली - एकूण ग्रामपंचायत - 30 ठाकरे गट - 2, शिंदे गट -24, राष्ट्रवादी - 1 महाविकास आघाडी गावपॅनल - 3 तर खेड तालुक्यात ग्रामपंचायत - ठाकरे गट - 6, शिंदे गट - 2  आणि गाव पॅनल - 2 ठिकाणी विजयी झाले.

रत्नागिरी तालुका : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वर्चस्व

रत्नागिरी तालुक्यात झालेल्या 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये कॉटे की टक्कर दिसून आली. यात ठाकरे गटाने वर्चस्व राखण्यात यश आले आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने जोरदार लढत दिली. ठाकरे गटाचे 14 सरपंच निवडून आणत बाजी मारली आहे. शिंदे गटाचे 10 आणि भाजपने इतर पाच ठिकाणी विजय मिळवला आहे. काही ठिकाणी सत्तांत्तर झाले आहेत. सहा सरपंच बिनविरोध झाल्याने सदस्यपदांसाठी 25 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगली आहे. सुरुवातीला केळ्ये ग्रामपंचायतीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने सरपंचांसह बहुमत मिळवत जोरदार वाटचालीला सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या गणेशगुळेमध्येही सत्तापरिवर्तन करीत शिंदे गटाने भाजपला मात दिली. या ठिकाणी शिंदे गटाच्या सरपंच व सदस्यांनी बाजी मारत वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली.

राजापूर तालुका : ठाकरे गटाचे वर्चस्व

राजापूर, लांजा आणि साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) उपनेते राजन साळवींच्या नेतृत्वाखाली अपेक्षेप्रमाणे चांगले यश मिळवले. राजापूर विधानसभा मतदार संघातील एकूण 53 ग्रामपंचायतींपैकी 35 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली तर उर्वरीत 18 ठिकाणी गाव पॅनल ,काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि भाजपने आपल्या जागा जिंकल्या आहेत.
 
राजापूर तालुक्यात एकूण 31 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. याठिकाणी शिवसेना (ठाकरे गटाने) 17 , भाजप 3, गाव पॅनल 4,काँग्रेस 3, मनसे 1, राष्ट्रवादी 1 व शिंदे गट 2 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. लांजा तालुक्यामध्ये तर शिवसेनेने (ठाकरे गट) एकुण 19 ग्राम पंचायतींपैकी 15 ठिकाणी शिवसेनेचे पॅनल उभे केले होते. यातील 2 ठिकाणी गाव पॅनेल तर 2 ठिकाणी भाजपा विजयी झाले आहे.

मंडणगड तालुका : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मुसंडी

आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून (शिंदे गट) ही निवडणूक लढवण्यात आली. त्यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय या तीन पक्षांची महाविकास आघाडी उभी होती. 13 पैकी कुंबळे, पिंपळोली, तिडे-तळेघर, वेसवी, देव्हारे व शिगवण या ग्रामपंचयतीचे थेट सरपंच निवडून आणत शिंदे गटाने निवडणूक निकालात आघाडी घेतली. तर महाविकास आघाडीने दहागाव, अडखळ, लोकरवण, बाणकोट, विन्हे, दुधेरे, बामणघर या 6  ग्रामपंचायतींचे थेट सरपंच निवडून आणत जोरदार लढत दिली. मुरादपूर ग्रामपंचायत गाव पँनेल म्हणून निवडून आली.