मुंबई : माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.
आधीच्या संगमेश्वर-लांजा मतदार संघाचे आमदार म्हणून रवींद्र माने सलग तीनवेळा निवडून आले होते. त्यानंतर ते नगरविकास राज्यमंत्री म्हणून आणि रत्नागिरीचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. तेव्हा ते शिवसेनेचे आमदार होते. मध्यतंरी ते आजारी असल्याने सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता ते स्वगृही परल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला अधिक मजबुत झालाय.
माने यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आता राष्ट्रवादीला संगमेश्वर तालुक्यात मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणाला एक नवी दिशा मिळणार आहे. संगमेश्वर तालुक्यात १९९० च्या दरम्यान शिवसेना रुजवण्यासाठी महत्वाची भूमिका रवींद्र माने यांनी बजावली होती. त्यानंतर पक्षाने विशेष करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विश्वास दाखवत आमदारकीची उमेदवारी दिली. त्यावेळी जनता दल व काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांनी सेनेचा भगवा फडकावला.
सलग तीन वेळा संगमेश्वर-लांजा मतदार संघात (पूर्वीचा) विजयी होत आमदारकीची हॅटट्रीक साधली होती. राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा विश्वास टाकत नगरविकास, अर्थ अशी महत्वाची मंत्रीपदाची खाती त्यांच्याकडे दिली होती. दरम्यान, कालांतराने रवींद्र माने यांची शिवसेनेत घुसमट झाल्याने त्यांनी २०१०ला शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता.
माने यांच्या प्रवेशाच्यावेळी शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रवींद्र वायकर, संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार सदानंद चव्हाण, आमदार उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व सचिन कदम, माजी आमदार सुभाष बने आदी उपस्थित होते. रवींद्र माने यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य भाई दळवी, माजी पंचायत समिती सदस्य राजू जाधव, आंबव-कोंडकदमरावचे सरपंच बाळ माने, दिलीप जाधव यांच्यासह अनेक समर्थकांनी प्रवेश केला.