अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : यंदाच्या वर्षी पावसाळा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके ही बहरली होती. मात्र हातातोंडाशी आलेलं पीक मात्र परतीच्या पावसाने हिसकावून नेलं आहे. एकट्या पश्चिम विदर्भातील केवळ पाच जिल्ह्यातील १ लाख ३० हजार हेक्टर वरील पीक पूर्णतः खराब झाल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारी मधून समोर आलं आहे. असं असलं तरी यापेक्षाही ही जास्त नुकसान झाल्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पश्चिम विदर्भात परतीचा पाऊस बरसला त्यामुळे सोयाबीच्या पिकाला कोंब फुटले आहे. मुसळधार पावसाने पीक खराब झाल्याने यंदा सोयाबीन पिकानेच शेतकऱ्यांचं तेल काढलं आहे. पश्चिम विदर्भ हा सोयाबीन पिकासाठी प्रसिद्ध आहे. यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न हे कपाशीचे घेतले जाते
यंदा कोरोनामूळे कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कमी दराने व्यापाऱ्यांना कापूस विकला. तरी देखील कापूस उत्पादनातून दोन पैसे मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात तबल १ लाख ३१ हजार हेक्टर वरील कपाशी, सोयाबीन, तूर, मुंग, उडीत सह आधी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४४ हजार हेक्टर, अकोला ३७ हजार ५०० हेक्टर, बुलढाणा ३८ हजार हेक्टर, वाशीम ९००० हजार हेक्टर आणि यवतमाळ मध्ये ३००० हजार हेक्टर वरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे यंदा ही शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी होणार असल्याचे चिन्ह आहे.
मोठ्या आशेने पिक घरी येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती, मात्र तसं काही झालं नसल्याची भावना येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनेक शेतात कृषी विभागाचे अधिकारी फिरकलेच नसल्याचा गंभीर आरोपही येथील शेतकऱ्यांनी केला आहे.