काश्मीरात युरोपियन पथक गरज आहे काय? शिवसेनेचा सवाल

२१ जणांचं हे शिष्टमंडळ कश्मीर खोऱ्यात 

Updated: Oct 30, 2019, 08:04 AM IST
काश्मीरात युरोपियन पथक गरज आहे काय? शिवसेनेचा सवाल

मुंबई : युरोपियन संघ (ईयू) चं संसदीय प्रतिनिधीमंडळाने २९ ऑक्टोबर रोजी काश्मीर दौरा केला. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळाने काश्मीरमध्ये पाहणी केली. २१ जणांचं हे शिष्टमंडळ असून या शिष्टमंडळाने काश्मीरचे राज्यपाल, खासदार आणि तरुणांशी संवाद साधला आहे. त्यामुळे या शिष्टमंडळाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून देखील भाष्य केलं आहे. 

काश्मीरात युरोपियन पथक गरज आहे काय? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. युरोपियन पथकाने काश्मीरात पर्यटन करून शांतपणे निघून जावे. वातावरण बिघडवू नये इतकेच आमचे सांगणे आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. काश्मीरातील लढाई ही पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधातील लढाई आहे. मोदी सरकारने ती लढाई जिंकली आहे, असं 'सामना'त म्हटलं आहे. 

तसेच शिवसेनेने पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणाकडे लक्ष वेधले आहे. दिवाळीचे फटाके फुटून विझले आहेत, पण राजकारणातील फटाके भिजले तरी विझत नाहीत. उलट भिजलेले फटाकेच जास्त वाजत आहेत, या सगळ्या फटाकेबाजीत राष्ट्रातील अनेक प्रमुख विषय मागे पडले असे होऊ नये, असं शिवसेनेला वाटत आहे. 

दूरध्वनी, मोबाईल, इंटरनेट सेवा काश्मीरमध्ये बहाल करण्यात आली आहे. आता कुठे तेथील जनता मोकळेपणाने स्वातंत्र्याचा स्वाद आणि श्वास घेत आहे. अशा वेळी युरोपियन समुदायाचे पथक काश्मीरात येण्याचे प्रयोजन काय? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. तसेच काश्मीर हा काही आंतरराष्ट्रीय विषय नाही.