'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...'

उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा भाजपाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत प्रवेश कऱण्याची ऑफर दिली आहे. नितीन गडकरी यांनी ही ऑफर नाकारली असून हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 13, 2024, 11:10 AM IST
'हे बालिश आणि हास्यास्पद', गडकरींनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली; संजय राऊत म्हणाले 'दिल्लीत तुमचा अपमान...' title=

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिली आहे. जर भाजपात तुमचा अपमान होत असेल तर तुम्ही महाविकास आघाडीत प्रवेश करा अशी जाहीर ऑफरच उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींनी दिली आहे. तुम्ही महाविकास आघाडीत आल्यास विरोधी पक्ष लोकसभा निवडणुकीत तुमच्या विजयाची खात्री करेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण नितीन गडकरी यांनी हे बालिश आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत ऑफर नाकारली आहे. यानंतर संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत?

उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमधील रॅलीत बोलताना म्हटलं होतं की, "कृपाशंकर सिंग यांच्यासारखे लोक ज्यांना भाजपाने कधीकाळी टार्गेट (भ्रष्टाचार प्रकरणी) केलं होतं. त्यांचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पहिल्या यादीत जाहीर केलं जातं. पण नितीन गडकरी यांचं नाव मात्र गायब आहे".

"मी दोन दिवसांपूर्वी नितीन गडकरींना म्हणालो होतो आणि आता पुनरुच्चार करत आहे. जर तुमचा अपमान होत असेल तर भाजपाला सोडा आणि महाविकास आघाडीत सहभागी व्हा. आम्ही तुमच्या विजयाची खात्री करु. आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही तुम्हाला मंत्री करु. या पदासह मोठी शक्तीही मिळेल," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

नितीन गडकरींनी नाकारली ऑफर

नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंची ऑफर नाकारली असून हे फार अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी तिकीट वाटपासाठी भाजपाच्या प्रस्थापित व्यवस्थेवर भर दिला. “उद्धव ठाकरेंचा सल्ला अपरिपक्व आणि हास्यास्पद आहे. भाजपमध्ये उमेदवारांना तिकीट देण्यासाठी एक पद्धत आहे," असं गडकरी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

"आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या. दिल्लीतील मराठी माणसाचा अवमान होऊ नये, तो आम्हाला सहन झाला नाही. मराठी माणसाला अवमान सहन करण्याची सवय नाही. त्यामुळे हे वक्तव्य केलं असेल तर चुकीचं आणि बालिश काय? तुम्ही वारंवार अपमान सहन करताय याचं आम्हाला दु:ख आहे," असं संजय राऊत म्हणाला आहेत. 

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली होती. जणू काही रस्त्यावरील व्यक्ती एखाद्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करण्याची ऑफर देत आहे असं वाटत असल्याचं फडणवीस म्हणाले होते. नितीन गडकरी हे भाजपाचे प्रमुख नेते आहेत. परंतु पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नावांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. कारण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली नाही, असं फडणवीस म्हणाले होते.