Devendra Fadnavis On Udayanraje Vs Shivendraraje: साताऱ्यामध्ये बुधवारी म्हणजेच 21 जून 2023 रोजी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि भाजपाचेच आमदार शिवेंद्रराजे भोसलेंमध्ये (Shivendraraje Bhosle) वाद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटले. या भेटीमुळे साताऱ्यातील राजकीय संघर्षामध्ये थेट फडणवीस मध्यस्थी करत असल्याची चर्चा आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात सुरु झाली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना कराड येथे भेटल्यानंतर फडणवीस यांनी या दोन्ही राजांमध्ये झालेला वाद आणि या भेटीमधील चर्चेबद्दलची माहिती पत्रकारांना दिली.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंच्या भेटीनंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. "दोन्ही राजांसोबत सातारातल्या विविध प्रश्नांवर माझी चर्चा झाली. येथे काही सिंचनाचे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांसंदर्भातील चर्चा झाली आहे. काही निवेदनं त्यांनी दिली आहेत. विशेषत: विकासकामांसंदर्भातच आमची चर्चा झाली," असं फडणवीस यांनी सांगितलं.
यावेळेस एका पत्रकाराने फडणवीस यांना, दोन्ही राजांचा काल वाद झाला त्याबद्दल काही चर्चा झाली का? असा थेट प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी, "दोघांनाही जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. अशा गोष्टी कधीकधी होत असतात. पण ते असं नाहीय की इथे काहीतरी फार गंभीर घडतंय किंवा फार अडचणीचं वगैरे आहे असं काही नाही आहे," असं उत्तर दिलं.
साताऱ्यात भाजपाचेच खासदार असलेल्या उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरु आहे. दोघेही एकाच पक्षाचे असले तरी त्यांची कामाची पद्धत वेगळी असल्याने त्यांचे अनेकदा खटके उडताना दिसतात. दोघेही अनेकदा एकमेकांवर कुरघोडी करत असतात. शाब्दिक टिकेपासून प्रत्यक्षातही अनेकदा या दोघांच्या समर्थकांमध्ये वाद झाला आहे. बुधवारी सकाळीही असाच प्रकार साताऱ्यामधील खिंडवाडीत घडला. बाजार समितीच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन शिवेंद्रराजेंच्या हस्ते होणार होतं. मात्र सकाळीच उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसहीत या नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना या ठिकाणी उभारण्यात आलेलं छोटं कार्यलय उद्धवस्त करण्यास सांगितलं. हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचून उदयनराजेंनी हा कार्यक्रम उधळून लावला. कार्यक्रमासाठी एक पत्र्याचं ऑफिस उभारण्यात आलं होतं. हे ऑफिस उदयनराजेंच्या देखरेखीखाली जेसीबीने उद्धवस्त करण्यात आलं. याच सर्व प्रकारानंतर आज दोघांनीही फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीत या विषयी चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.