मुलाच्या प्रेमप्रकरणाला नकार देणारी आई...; आत्महत्येच्या खटल्यात हायकोर्टाचा निर्णय

High Court Verdict On Love Relationship: मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमधील पीडितेने प्रेमप्रकरणामधून आत्महत्या केली. यानंतर या तरुणीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 11, 2024, 02:03 PM IST
मुलाच्या प्रेमप्रकरणाला नकार देणारी आई...; आत्महत्येच्या खटल्यात हायकोर्टाचा निर्णय title=
मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

High Court Verdict On Love Relationship: मुंबई हायकोर्टाने प्रेमसंबंधांसंदर्भातील प्रकरणात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मुंबई हायकोर्टाने खटल्याच्या सुनावणीदरम्यान मरण पावलेल्या तरुणीच्या प्रियकराच्या आई आणि बहिणीची निर्दोष मुक्तता केली आहे. प्रेमसंबंधनांना नकार दिल्याने मृत मुलीच्या प्रियकराच्या आईला आणि बहिणीला आत्महत्येसाठी जबाबदार धरता येणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. प्रेमप्रकरणासंदर्भातून मुलीचे प्रियकराबरोबरचे नाते मान्य नाही असं आईनं सांगणं हे आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यासाठी पुरेसे नसल्याचं निर्वाळा कोर्टाने केला आहे.

कोर्टाने आई आणि बहिणीला केलं दोषमुक्त

मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकल खंडपीठाने केली. न्या. कर्णिक यांनी या प्रकरणामध्ये आई मंगला दाभाडे आणि बहीण तृप्ती दाभाडे या दोघींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी अमोलचे पीडितेबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र अमोलबरोबरचं तुझं नातं आम्हाला मान्य नाही असं या मुलाच्या आईने आणि बहिणीने तिला सांगितले होते. यामुळे ती तणावात होती आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा दावा पीडितेच्या आईने केला होता. पण सुनावणीदरम्यान या दाव्याला पाठबळ देणारे ठोस पुरावे आरोप करणाऱ्या महिलेला सादर करता आले नाहीत. तसेच तुमचं नातं आम्हाला मान्य नाही असं आरोपीच्या आईने आणि बहिणीने एकदाच या तरुणीला सांगितलं होतं. याशिवाय मुलाच्या प्रेयसीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारं कोणतेही कृत्य या दोघींनी केलं नाही, असं कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर निकाल देताना म्हटलं.

नेमकं घडलेलं काय?

या प्रकरणातील पीडितेने 8 फेब्रुवारी 2018 रोजी आत्महत्या केली. आरोपी अमोलचे पीडितेबरोबर प्रेमसंबंध होते. मुलीने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईनेच  20 फेब्रुवारी 2018 रोजीअमोलविरोधात तक्रार दाखल केली. अमोलचे दुसऱ्या मुलीबरोबर नातेसंबंध असल्यानेच माझ्या मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप सदर महिलेने केला होता. मात्र 3 मार्च 2018 रोजी पीडितेच्या आईने नोंदवलेल्या पुरवणी जबाबामध्ये आरोपीच्या आई आणि बहिणीचाही उल्लेख केला. 'अमोलच्या आईने आणि बहिणीने पीडितेला तू आमच्या जातीची नाहीस. तुझे नाते आम्हाला मान्य नाही, असं म्हणाल्या' असा दावा मृत मुलीच्या आईने केला. 'अमोलच्या आई आणि बहिणीने केलेल्या दाव्यामुळे ती तणावात होती. तिच्या आत्महत्येसाठी आरोपीची आई आणि बहिणही जबाबदार आहेत,' असं मृत तरुणीच्या आईचा दावा होता. या जबाबानुसार दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कोर्टाने या दोघींना कोर्टाने दिलासा देत दोषमुक्त केलं आहे.