Jayant Patil Secret Meeting: मे महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एक गट राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सहभागी झाला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादीत 2 गट पडले आहेत. शरद पवारांबरोबर कायम राहिलेल्या नेत्यांमध्ये जयंत पाटील यांचा समावेश आहे. मात्र आज जयंत पाटील यांनी घेतलेल्या एका भेटीमुळे त्यांच्या भूमिकेसंदर्भात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत पाटील यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आज सकाळी जे. डब्ल्यू मॅरीएट हॉटेलमध्ये शाह आणि जयंत पाटील यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातं. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बंडखोर गटाचे प्रमुख अजित पवार यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी केल्याचं सांगितलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजापाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन जयंत पाटलांना बोलावून घेतलं. या भेटीमुळे आता जयंत पाटील हे भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
जयंत पाटील यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. त्यांनी सकाळीच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील 'सिव्हर ओक' या निवासस्थानी भेट घेतली. या भेट सत्रामुळे अजित पवार वेगली राजकीय भूमिका घेणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.
जयंत पाटील सोबत आले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया या भेटीसंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी नोंदवली आहे. "खरंतर त्यांनी (जयंत पाटलांनी) सुरुवातीला जायला पाहिजे होतं दादांसोबत (अजित पवारांबरोबर). पण ते का मागे राहिले याची मला कल्पना नाही," असंही सामंत म्हणाले. "अजितदादा इथं आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना जाणीव झाली असेल खरच गतिमान सरकार आहे. त्यामुळेच कदाचित ते निर्णय घेत असतील.
निर्णय घेतला की नाही माहिती नाही मात्र घेतला असेल तर आमच्या दृष्टीने चांगलं आहे," असं उदय सामंत म्हणाले.
"एवढ्या मोठ्या स्तरावर मी चर्चा करत नाही. यासंदर्भातील हक्क मुख्यमंत्रीजी, देवेंद्रजी व अजित दादांकडे आहे. अजितदादा गेल्यानंतर त्यांनी (जयंत पाटलांनी) 15 दिवस अभ्यास केला असेल. त्यांना सुद्धा पटलं असेल सरकार हे गतिमान आहे आणि या सरकारमध्ये आल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. असं मत बदलल्यामुळे ते निर्णय घेत असतील," असंही उदय सामंत यांनी म्हटलं.