मुकूल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्र्यांकडे समस्या घेऊन जाणारा प्रत्येक शेतकरी, प्रत्येक आंदोनकर्ता मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता वाटतो', असं शरद पवारांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं. मंत्रालयावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असा आरोप होत आहे, यावर शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली भेट ही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविषयी होती, तेव्हा त्याचे राजकीय अर्थ लावू नये, असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीचं स्पष्टीकरण दिलं आहे. कर्जमाफीसाठी २५ नोव्हेंबरनंतर आपण रस्त्यावर उतरणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलंय.
तसेच काही वस्तुंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय हा गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला असल्याचंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये काँग्रेस-सोबत आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं, गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेच्या १० ते १२ जागा लढवणार असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.