शरद पवार यांनी पहिल्यांदाच घेतले गौतमी पाटीलचे नाव; असं काही म्हणाले की...

शरद पवार यांनी गौतमी पाटीलचे नाव घेत सरकारवर टीका केली आहे. यानिमित्ताने शरद पवार यांनी प्रथमच आपल्या भाषणात गौतमी पाटीलच्या नावाचा उल्लेख केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 11, 2023, 06:18 PM IST
शरद पवार यांनी पहिल्यांदाच घेतले गौतमी पाटीलचे नाव; असं काही म्हणाले की...  title=

Sharad Pawar On Gautami Patil : महाराष्ट्राची लावणी डान्सच गौतमी पाटील कायम चर्चेत असते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच गौतमी पाटीलच्या नावाचा उल्लेख केला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार यांनी महिला आघाडीला मार्गदर्शन करताना गौतमीचे उदाहरण दिले. गौतमीचे नाव घेत शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

गौतमी पाटीलवरून शरद पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शाळा खासगी कंपन्यांना चालवायला देण्याच्या सरकारच्या धोरणाला विरोध करताना पवारांनी लावणी स्टार गौतमी पाटीलचं उदाहरण दिलं. गौतमीचा आदर्श मुलांसमोर ठेवणार का? असा सवाल पवारांनी केला. शाळा खासगी कंपन्यांना देण्याच्या धोरणाला विरोध करा, असं आवाहन त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना केले.

नाशिकमध्ये दिवसा शाळा आणि रात्री गौतमी पाटीलची लावणी

नाशिकमध्ये दिवसा शाळा आणि रात्री तमाशा सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या शाळेत पार पडला. दिंडोरीमधल्या वलखेड जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. विशेष म्हणजे याच शाळेत दिवसा विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, रात्री डीजे स्पीकर्सच्या दणदणाटात गौतमी पाटील नृत्य करत होती. शाळेत लावणी करण्याची परवानगी दिलीच कोणी असा सवाल उपस्थित झाला होता. विद्यार्थ्यांवर हेच संस्कार करणार आहात का असा सवालही नागरिकांनी विचारला होता. दारुच्या विविध ब्रँडसाठी प्रसिद्ध असलेल्या एका कंपनीने ही शाळा दत्तक घेतली होती. गौतमीचा हा कार्यक्रम परिसरातल्या सर्व गावांसाठी मोफत ठेवण्यात आला होता.

नेमकी काय आहे सरकारची शाळा दत्तक योजना

राज्यातील ग्रामीण, शहरी भागातील सर्व जिल्हा परिषद, महापालिका शाळांना आता तुमचं नाव देता येणार आहे. शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी दत्तक शाळा योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, व्यावसायिक कंपन्यांकडून देणगी घेऊन त्यांची नावे शाळांना देता येतील. यातून मिळालेल्या देणगीचा वापर इमारत दुरुस्ती, देखभाल, रंगरंगोटीसह गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे. देणगीच्या रकमेनुसार दत्तक योजनेचा कालावधी ठरणार आहे.  गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सरकारने याबाबतचा आदेश लागू केला आहे. त्यासाठी विशेष  समित्याही स्थापन केल्या आहेत.