सातारा : लोकसभा मतदारसंघातले शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करत लोकसभेचा अर्ज भरला. त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने, एका कार्यक्रमात शिवेंद्रराजेंची गळाभेट घेतली. एवढ्यावरच न थांबता नरेंद्र पाटील यांनी चक्क एकच राजे, बाबा राजे अशा जोरदार घोषणाही दिल्या. या घोषणाबाजीनंतर शिवेंद्रराजे समर्थकांनीही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्या बरोबर एकत्र मिसळ खात, उदयनराजेंना मिसळीच्या तरीचा झटका दिला होता. त्यानंतर आता नरेंद्र पाटलांनी वाढदिवसानिमित्त शिवेंद्रराजेंची गळाभेट घेत घोषणाही दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजे यांची वाढती जवळीक साताऱ्यातल्या वेगळ्या राजकीय समिकरणाची नांदी ठरु शकते.