...म्हणून मेट्रो ५ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार

मेट्रो नेमकी कोणाची... रंगतंय श्रेयवादाचं राजकारण  

Updated: Dec 18, 2018, 09:07 AM IST
...म्हणून मेट्रो ५ भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार  title=

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकांच्या धर्तीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, शक्य त्या सर्व मार्गांनी विकास कामांकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून विकास कामांच्या भूमीपूजनांना उधाण आलं असून, सत्ताधारी पक्षांमध्ये असणारे वाद आणि मतभेदही चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी मेट्रो ५ या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार असून, या कार्यक्रमावर शिवसेना नेतेमंडळींनी मात्र बहिष्कार टाकला आहे. कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेट्रो ५ प्रकल्पाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना आमंत्रण नसल्यामुळे शिवसेना नेत्यांमध्ये संताप असल्याचं कळत आहे. ज्यामुळेच आता या पक्षाकडून भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना आमंत्रण असूनही ते आणि पक्षातील आणखी नेते या कार्यक्रमाला येणार नसल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून देण्यास आली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये आता विकास कामांच्या श्रेयवादाच्या लढाईने डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या अख्त्यारित कोस्टल रोडची हद्द आल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हस्ते त्याचं उदघाटन करण्यात आल्याचं कारण देण्यात आलं होतं. ज्यामुळे नाराज भाजप नेत्यांनी कोस्टल रोड भूमीपूजवार बहिष्कार टाकला होता. ज्यामागोमागा आता शिसेनेनेही भाजपच्याच पावलावर पाऊल टाकत मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजक कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. 

मुख्य म्हणजे कल्याण, डोंबिवली परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या प्रकल्पाविषयी आचा संबंधित परिसरात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले असून, सदर विकास कामांचं श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा सुरु आहे. ही स्पर्धा आणि एकंदर वातावरण पाहता प्रकल्प कोणीही हाती घ्या, श्रेय कोणीची घ्या पण त्याची कामं वेळेत आणि लवकरात लवकर पूर्ण करा असंच मत स्थानिकांनी मांडलं आहे.