नाणारचा संघर्ष पेटणार, शिवसेना आमदारांनी राजदंड पळवला

नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष पेटणार आहे.

Updated: Jul 11, 2018, 03:31 PM IST

नागपूर : नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष पेटणार आहे. नाणार प्रकल्पाविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घातला. नाणारच्या मुद्द्यावरून विधानसभेत शिवसेना आमदारांनी राजदंड पळवलाय.  राजन साळवी,नितेश राणे, राजेश क्षीरसागर प्रताप सरनाईक यांच्यामध्ये राजदंड पळवण्यावरून चढाओढ लागली. नाणारवरून विधानसभेत शिवसेना आमदारांची फलकबाजी  केली. नितेश राणे आणि राजन साळवी यांनी राजदंड पळवला.

दरम्यान नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला शेतकऱ्यांनी २५०० एकर जमीन मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा असल्याचा आरोप नाणार संघर्ष समितीनं केलाय. २५०० एकर जमीन प्रकल्पाला देण्याची सहमती पत्र सरकारला आली असल्याचा दावा विधानपरिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यावर कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी हा आरोप केला.

नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधात नागपुरात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज  प्रकल्प बधितांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारलंय. ती जमीन गुजराती, मारवाडी व इतर लोकांनी घेतलेल्या जमीन सरकारने घेतल्याचे वालम यांनी सांगितले.

शिवसेना या प्रकल्पाला विरोध करत आहे त्यामुळे सभागृहात या विषयावर सेनेच्या मंत्र्याऐवजी मुख्यमंत्री स्वतः उत्तर देत असल्याचा आरोप वालम यांनी केला. शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेत गोंधळ घातला.वेलमध्ये येऊन प्रकल्पाविरोधात घोषणा दिल्या. शिवसेनेच्या गोंधळामुळे कामकाज चार वेळा तहकूब करण्यात आलं.