गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? शिवसेनेनं राष्ट्रवादीचे कान टोचले

 गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

Updated: Jan 6, 2020, 07:59 AM IST
गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? शिवसेनेनं राष्ट्रवादीचे कान टोचले title=

मुंबई : खातेवाटप हे 'बक्षिसी आणि तडजोडीचे उद्योग असतात. ते झाले असून आता कामाला लागा अशी कानटोचणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून खातेवाटप झालेल्या मंत्र्यांना हा सल्ला देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीकडे गेलेल्या गृह खात्याकडे बोट करण्यात आले आहे. गृहखाते हे जोखमीचे आहे. याआधी राष्ट्रवादीने आर.आर.पाटील, जयंत पाटील, भुजबळ अशा नेत्यांकडे हे खाते दिले. आता अनिल देशमुख यांच्याकडे हा कार्यभाग दिलाय. आमच्याकडे गृहखाते घ्यायला कोणी तयार नाही, गृहखाते नको असे खुद्द पवार २-३ दिवस आधी सांगत होते. त्यामुळे गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

भाजप सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले. गृहखात्याची नंगी तलवार घेऊनच फडणवीस फिरत होते. या तलवारीनेच त्यांचा घात केला. अजित पवार किंवा दिलीप वळसे पाटील यांच्यासारखा नेता हे खाते संभाळण्यास सक्षम होता असे देखील सामनातून म्हटले आहे. विदर्भाकडे हे खाते देण्याचा पवारांचा निर्णय किती यशस्वी ठरतोय हे कळेलच असेही म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची अंतर्गत धुसपूस समोर येण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

राज्यपालांवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाची यादी राजभवनात पाठवली पण राज्यपालांची झोपण्याची म्हणजेच विश्रांतीची वेळ झाल्याने ते खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही करु शकले नाहीत. शेवटी रविवारच्या रामप्रहरी सहीशिक्क्याने ही मंजूरी झाल्याचे सामनात म्हटले आहे. यावेळी राज्यपालांनी रामप्रहरी उठून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ दिल्याची आठवण शिवसेनेने करुन दिली आहे. या दोघांना शपथ देण्यासाठी राज्यपाल राजभवन उघडे ठेवतात आणि स्वत:ही जागे राहतात. यामुळे पवारांना आश्चर्य वाटणे साहजिकच असल्याचे म्हटले आहे.