मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण राणा पाटलांच्या भाजप प्रवेशामुळे ढवळून निघालं आहे. त्यामुळे भाजपचे जुने कार्यकर्ते पाटलांची उमेदवारी मान्य करतील का? किंवा राष्ट्रवादीची काय रणनीती असेल हे पाहावं लागणार आहे.
राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजितसिंह पाटलांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीच्या विशेषत: पवारांच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळेच की काय काही दिवसांपू्र्वी उस्मानाबादमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अवघी राष्ट्रवादी काँग्रेस एकवटली आणि राणा पाटलांविरोधात पक्षानं दंड थोपटले.
उस्मानाबाद जिल्ह्यात राणाजगजितसिंह पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील हे नवं नेतृत्व मान्य होईल का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे. तर युती झाल्यास राणा जगजितसिंह पाटलांचा प्रचार करण्यास शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी नकार दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. त्यात राणा पाटलाचं नेतृत्व जुने भाजपा कार्यकर्ते मान्य करतील का? युती झाल्यास शिवसेना कार्यकर्ते युतीधर्म पाळतील का? राष्ट्रवादी काँग्रेस हे आव्हान कसं निभावेल? या प्रश्नांची उत्तरं लवकरंच स्पष्ट होतील.