पुणे : भाजप दगाफटका करणार हे आम्हाला माहिती होत. त्यामुळे आम्ही शरद पवारांशी चर्चा सुरु केली होती असे शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत म्हणाले. एका जाहीर मुलाखतीत त्यांनी सर्व प्रश्नांना हजरजबाबीपणे उत्तर देत आपल्यातील पत्रकार आणि नेत्याच्या गुणांची चुणूक त्यांनी दाखवून दिली. यावेळी त्यांनी स्वत:ची सुरुवातीची पत्रकारिता ते सत्तास्थापनेपर्यंतचा प्रवास उलगडला. यावेळी अजित पवारांच्या सत्तास्थापनेचा फसलेल्या प्रयत्नाचा किस्सा चर्चेत राहीला.
अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन भाजपने तुमची सत्तास्थापनेचा प्रयत्न करणारी तीन चाकी गाडी पंक्चर करण्याचा प्रयत्न केला का ? गाडीचे चाक पळवून घेऊन गेले का ? असा प्रश्न संजय राऊत यांना ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी विचारला. त्यावेळी हजरजबाबी असलेल्या संजय राऊत यांनी भाजपने आमच्या गाडीचे चाक नेले नाही तर स्टेपनी पळवून नेली होती असे मिश्किल उत्तर दिले.
यावर प्रतिप्रश्न करताना अजित पवार हे स्टेपनी आहेत का ? त्याचे गाडीत कमी महत्व आहे का ? असा प्रतिप्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गाडीत स्टेपनीचे महत्व खूप असते. दुरच्या प्रवासाला जाताना आपण स्टेपनी सोबत बाळगतो त्यामुळे स्टेपनी ही महत्वाची असल्याचा खुलासा त्यांनी केला.
यावेळी राऊत यांनी भाजपच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नावेळचा धनंजय मुंडे यांचा किस्सा सांगितला. धनंजय मुंडे देखील अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापनेसाठी गेले होते. तर ते कसे परतले याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला नसतानाही संजय राऊत यांनी धनंजय मुंडे हे परतत असल्याचे जाहीर केले होते. आणि प्रत्यक्षात धनंजय मुंडे परतले होते.
याबद्दल सांगताना राऊत म्हणतात, शरद पवार हे धनंजय मुंडे यांच्या प्रत्यक्ष संपर्कात होते. त्यामुळे ते परतणार असल्याचा विश्वास मला होता. त्यामुळे मुंडे देखील येत असल्याचे विश्वासाने म्हटल्याचे राऊत म्हणाले.