close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शिवसेना राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार - खासदार राऊत

'राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार.'

Updated: Oct 14, 2019, 02:09 PM IST
शिवसेना राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार - खासदार राऊत
संग्रहित छाया

रत्नागिरी : भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेशी वाद संपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शिवसेनेकडून कटुता मात्र कायम आहे. राणे प्रकरण संपलेले असून, विधानसभा निवडणुकीत कणकवलीत शिवसेना राणे प्रकरणाला पूर्णविराम देणार आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.  

मुख्यमंत्र्यांचा सल्ला, राणेंची माघार

दरम्यान, शिवसेनेवर टीका करणाऱ्यावरुन दोघा राणे बंधुंमध्ये वाद असल्याचे उघड झाले. मात्र, त्यानंतर सारवासारव करण्यात आली. नितेश राणे आणि आपल्यात कोणतेही मतभेत नसल्याचं माजी खासदार नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शिवसेना माघार घेऊपर्यंत त्यांचा विरोध करत राहणार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली. नारायण राणेंवर टीका केली तर जशास तसे उत्तर देऊ, असेही त्यांनी नमूद केले आहे. नितेश राणेंची मरेपर्यंत साथ सोडणार नसल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तर ट्विटरवरून त्यांनी आपले मत मांडल्याचे नितेश राणेंनी सांगितले. दोन भावांची वेगवेगळी मते असू शकतात. त्यात काय गैर आहे, असे नितेश राणे म्हणालेत.

'शिवसेनेसोबतची कटुता संपवा'

शिवसेनेसोबत असलेली कटुता संपवा, असा सल्ला नारायण राणे यांना दिला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले  होते. 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत आणि निवडणुकीनंतरही शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करु नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी राणेंना केले. बाळासाहेबांबाबत तुमच्या मनात श्रद्धा आहे, तर मग ही कटुता किती दिवस ठेवणार? ही कटुता संपली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर नितेश राणे यांनी आपण मुख्यमंत्री यांचा सल्ला पाळणार आहोत. यापुढे मी टीका करणार नाही, असे म्हटले. त्यानंतर नीलेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली होती.