नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार

या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं.   

Updated: Mar 20, 2022, 11:07 AM IST
नात्यांना कलंक; पुण्यात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडील, भावाकडून लैंगिक अत्याचार  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

पुणे : माणुसकी आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेनं पुणे हादरलं आहे. इथं एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच भावाने आणि वडिलांनी बलात्कार केला. तर या मुलीचा तिचे आजोबा आणि मामाकडूनही विनयभंग झाल्याचं म्हटलं गेलं. (Pune news)

मागील पाच वर्षांपासून सुरु असणाऱ्या या अत्याचारांना आता वाचा फुटली आणि सर्वांनाच हादरा बसला. 

सदर प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंविधानाअन्वये बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. अद्यापही या प्रकरणाअंतर्गत कोणतीही अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. 

शाळेतील समुपदेशनादरम्यान झालेल्या संवादातून ही बाब समोर आली. ज्यानंतर बंडगार्डन पोलीस स्थानकात सदरील प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली. 

ही मुलगी आणि तिचं संपूर्ण कुटुंब मुळचं बिहारचं असून सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत. 

चांगला आणि वाईट स्पर्श, यासंदर्भातील एका समुपदेशनपर कार्यक्रमादरम्यान शाळेत हे प्रकरण उघडकीस आलं. तिच्यावर मागील पाच वर्षांपासून हे अत्याचार होत असल्याचं गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते म्हणाल्या. 

2017 पासूनच या मुलीचा लैंगिक छळ करण्यात तिच्या वडिलांनी (45) सुरुवात केली. ज्यावेळी हे कुटुंब बिहारमध्ये होतं. तर 2020 पासून तिच्या भावानं तिच्यावर अत्याचार केले. 

मुलीचे आजोबा (60) आणि चुलत मामा (25) तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होते. हादरवणारी बाब अशी की प्रत्येकजण एकमेकांच्या या कृत्यांपासून अनभिज्ञ आहेत. त्यामुळं सध्या हे प्रकरण सामुहिक बलात्कार म्हणून उल्लेखलं जाऊ शकत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.