कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण​​

प्रवाशाला तिकिटातून उरलेले ५ रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते

शुभांगी पालवे | Updated: Oct 7, 2018, 11:28 AM IST
कल्याणमध्ये ५ रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण​​  title=

कल्याण : अवघ्या पाच रुपयांसाठी एसटी कंडक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय. आज सकाळच्या सुमारास कल्याणहून मुरबाडला जाणाऱ्या एसटी बसमध्ये हा प्रकार घडला.

ही बस कल्याण एसटी डेपोतून सुटल्यानंतर कंडक्टर नितीन खंडागळे हे तिकीट वाटत होते. यावेळी एका प्रवाशाला तिकिटातून उरलेले ५ रुपये देण्यासाठी त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे सुट्टे झाल्यावर देतो, असं म्हणून ते पुढे निघाले. मात्र, यावेळी या प्रवाशांनी त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

हा प्रकार पाहून एसटी चालकाने एसटी बस सरळ पोलीस ठाण्याबाहेर आणून उभी केली आणि पोलिसांना पाचारण केलं. 

पोलिसांनी कंडक्टरला मारहाण करणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी कंडक्टर नितीन खंडागळे यांनी केलीय.