मोठी बातमी: रायगडमधून तटकरे व कोल्हापूरात धनंजय महाडिकांना लोकसभेची उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी

Updated: Jan 4, 2019, 07:20 PM IST
मोठी बातमी: रायगडमधून तटकरे व कोल्हापूरात धनंजय महाडिकांना लोकसभेची उमेदवारी title=

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड आणि कोल्हापूर या दोन महत्त्वपूर्ण मतदारसंघातील उमेवारांच्या नावावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार रायगडमधून सुनील तटकरे तर कोल्हापूरमधून धनंजय महाडिक लोकसभेची निवडणूक लढवतील. मुंबईत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेत्यांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला. रायगडमधून भास्कर जाधव यांनीही उमेदवारी मागितली होती. मात्र, शरद पवार यांनी भास्कर जाधवांची समजूत काढून तटकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याशिवाय, कोल्हापूर मतदारसंघातही धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यास हसन मुश्रीफ यांचा विरोध होता. परंतु, पवारांनी महाडिकांच्या पारड्यात दान टाकले. धनंजय महाडिक हे विद्यमान खासदार आहेत. 

याशिवाय, राष्ट्रवादीकडून राज्यातील अन्य मतदारसंघातील उमेदवारांचीही चाचपणी करण्यात आली. त्यानुसार उस्मानाबादमधून माजी मंत्री दिलीप सोपल, पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत. तर बीडमधून जयदत्त क्षीरसागर, अमरसिंह पंडित आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाचा विचार सुरु आहेत. परभणी मतदारसंघातील उमेदवारीसाठी बाबाजानी दुर्राणी आणि विजय भांबळे यांच्यात चुरस आहे. आजच्या प्राथमिक चर्चेनंतर लवकरच या मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादीचे केवळ चार उमेदवार निवडून आले होते. 

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू होती. यापैकी बहुतांश जागांवर कोण लढणार, याविषयी दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. मात्र, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नंदुरबार, यवतमाळ, औरंगाबाद आणि रावेर या मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.